पुण्यातील हिंजवडी येथे मजुरांसाठी उभारलेल्या पत्रा शेडचा लोखंडी सज्जा कोसळून अपघात झाला.
पुणे- पुण्यातील हिंजवडी येथे मजुरांसाठी उभारलेल्या पत्रा शेडचा लोखंडी सज्जा कोसळून अपघात झाला. या मध्ये एकाचा मृत्यू झाला तर ३० ते ३५ जण जखमी आहेत. ही घटना रविवारी उशिरा रात्री घडली.
अजब लाल या कामगाराचा मृत्यू झाला तर जखमी झालेल्या कामगारांवर हिंजवडी आणि वाकड येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी लेबर कॅम्प बांधकाम करणारा कॉन्ट्रॅक्टर, सेफ्टी मॅनेजर बालाजी नागराजन, कॅम्प सुपरवायझर तपस व इतरांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एल अॅन्ड डब्ल्यू या कन्स्ट्रक्शन साईटच्या मजुरांना राहण्यासाठी पत्राशेड बांधून देण्यात आले होते. हे पत्राशेड सहा महिन्यापूर्वीच बांधण्यात आले होते. यामध्ये पाच ब्लॉक होते ज्यामध्ये ८० खोल्या होत्या व एका खोलीमध्ये १० ते १५ लोक असे एक हजार १०० लोक राहत होते.
मेसमध्ये जेवणावरून किरकोळ वादावादी झाल्याने पहिल्या मजल्यावरील व तळमजल्यावरील कामगार बाहेर आले. यावेळी ते ज्या सज्ज्यावर उभे राहीले होते तो लोखंडी सज्जा वजनाने कोसळला. यामध्ये सुमारे ३० ते ३५ कामगार जखमी झाले.
कामगारांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून, निकृष्ट दर्ज्याचे सामान वापरल्या बद्दल हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.