लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त शतायु ग्रंथालय व ग्रंथकार संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
चिपळूण– येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त शतायु ग्रंथालय व ग्रंथकार संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ ते ११ जानेवारी दरम्यान होणा-या या संमेलनाच्या उद्घाटनासाठी लोकसभेच्या सभापती व चिपळूणच्या माहेरवाशीण श्रीमती सुमित्रा महाजन उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
राज्यभरात शंभरहून अधिक ग्रंथालयांनी शताब्दी वर्ष साजरे केले आहे. या ग्रंथालयांच्या कार्यकर्त्यांचे अधिवेशन होणार आहे. प्रारंभी ग्रंथालयांचे संमेलन या स्वरूपात आयोजन करण्यात येत होते. मात्र, या वर्षी लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याने ग्रंथालये व ग्रंथकार अधिवेशन या नावाने हे संमेलन होणार आहे. संमेलनाला उद्घाटक म्हणून श्रीमती सुमित्रा महाजन उपस्थित राहाव्यात यासाठी येथील कार्यकर्त्यांनी त्यांची दिल्ली येथे भेट घेतली व निमंत्रण दिले. हे निमंत्रण त्यांनी स्वीकारले आहे.
या वेळी वाचनालयाच्या वतीने साकारण्यात येत असलेल्या उषाताई साठे सभागृहाची माहिती त्यांना देण्यात आली. यानिमित्ताने चिपळूणमध्ये त्यांचा नागरी सत्कारही आयोजित करण्यात येणार आहे.