लोकप्रतिनिधींचा अवमान करण्याचा अधिकार प्रसारमाध्यमांना आहे का? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी विधान परिषदेत केला.
नागपूर- प्रसारमाध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते. त्यांना आपले मत मांडण्याचा अधिकार असला, तरी लोकप्रतिनिधींचा अवमान करण्याचा त्यांना अधिकार आहे का? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी विधान परिषदेत केला. लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘मस्ती तेथे माती’ या अग्रलेखात लोकप्रतिनिधींबद्दल वापरलेल्या भाषेबाबत राणे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
सनदी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांना विधानसभेच्या हक्कभंग समितीने दोषी ठरविले आहे. त्याचा संदर्भ देत दै. ‘लोकसत्ता’मध्ये ‘मस्ती तेथे माती’ या शिर्षकाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात लोकप्रतिनिधींबाबत अपमानकारक शब्द वापरले असल्याने हा मुद्दा नारायण राणे यांनी विशेष उल्लेखाद्वारे सभागृहात उपस्थित केला.
ते म्हणाले की, ‘मस्ती आणि माती’ या अग्रलेखात जे शब्द वापरलेले आहेत, ते लोकप्रतिनिधींचा अवमान करणारे आहेत. प्रसारमाध्यमांना आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो. त्यांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु लोकप्रतिनिधींचा अवमान करण्याचा त्यांना अधिकार आहे का? असा सवाल राणे यांनी केला.
काँग्रेसचे सदस्य शरद रणपिसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य हेमंत टकले यांनीही राणे यांनी व्यक्त केलेल्या मताचे समर्थन केले.
[EPSB]
लोकप्रतिनिधींचा अवमान करणा-याविरूद्ध कडक भूमिका घ्या- नितेश राणे
एखाद्या अधिका-याच्या बचावासाठी पत्रकार राज्यातील कोणत्याही लोकप्रतिनिधींचा अवमान करत असतील, तर त्यांच्याविरोधात कडक भूमिका घ्यावी, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत केली.
[/EPSB]