पूर्वी हस्तकौशल्याने सुतारांकडून बनवली जाणारी तबला, मृदंग, ढोल यासारख्या वाद्यांची निर्मिती बंद पडू लागली आहे. कारागीरही दुर्मीळ झाले आहेत.
राजापूर – पूर्वी हस्तकौशल्याने सुतारांकडून बनवली जाणारी तबला, मृदंग, ढोल यासारख्या वाद्यांची निर्मिती बंद पडू लागली आहे. कारागीरही दुर्मीळ झाले आहेत. तरीही या वाद्यांची निर्मिती करणे आता सहज शक्य झाले आहे. शहर बाजारपेठेतील सिध्दी इलेक्ट्रिकल्सचे राजू रानडे यांनी इंजिनीयरिंग वर्कसाठी उपयोगात येणा-या लेथ मशीनच्या वापराने या वाद्यांची पुनर्निर्मिती सुरू केली आहे. त्यामुळे आता शिसम, खर आणि शिवण यांसारख्या उच्च दर्जाच्या लाकडापासून या नाद वाद्यांची दर्जेदार निर्मिती सहज शक्य होणार आहे.
तबला, मृदंग, ढोल या नादवाद्यांना योग्य आणि उच्च दर्जाचा नाद प्राप्त होण्यासाठी त्याला वापरले जाणारे लाकूड आणि त्याच्या योग्य आकारातील मापाला महत्त्व दिले जाते. त्यामुळे पूर्वी ग्रामीण कलाकार आपल्या हस्तकौशल्यातून या वाद्यांची निर्मिती करत. लाकडाच्या ओंडक्याला पोखरून आवश्यक तो आकार आणि गोलाई देण्यासाठी या कारागिरांना प्रचंड मेहनत घ्यावी लागे. त्यात फार वेळ जात असे.
पुढे औद्योगिक क्रांती झाली आणि या वाद्यांसाठी लागणारी शिसम, खरसारखे लाकूड मिळणेही तसे दुर्मीळ होऊ लागले. त्यामुळे पर्यायी लाकडापासून रेडीमेड मिळणारी वाद्ये वापरात येऊ लागली. परंतु ग्रामीण कारागिरांकडून निर्माण होणा-या या वाद्यांच्या तुलनेत त्याचा दर्जा आणि गुणवत्ता मिळत नसल्याने त्यातील दर्दी आणि हौशी मंडळींची गैरसोय होत होती. ते अशा कलाकारांचा शोध घेऊन मुद्दामहून अशी वाद्ये बनवून घेत असत. परंतु आता हे कलाकारही दुर्मीळ होऊ लागले आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन आयटीआय इलेक्ट्रिशियन असलेल्या रानडे यांनी एरवी इंजिनीयरिंग वर्क्ससाठी उपयोगात आणल्या जाणा-या ‘लेथ मशीन’चा वापर करून या वाद्यांची निर्मिती करता येऊ शकते का, याकडे लक्ष देऊन त्याची निर्मिती करण्याचे ठरविले.
लेथ मशीनवर विशिष्ट अंशात काम होत असल्याने तबला, ढोलकी किंवा मोठय़ा आकाराचे ढोल बनवणे सहज शक्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी या वाद्यांची नव्याने निर्मिती सुरू केली. यासाठी त्यांना दुकानातील कारागीर प्रकाश खानविलकर यांचे सहकार्य लाभत आहे. या वाद्यांच्या निर्मितीसाठी हाती आलेल्या लाकडाच्या ओंडक्याला कोरून हवा तसा आकार देता यावा म्हणून विविध टुल्स बनविली आहेत. त्यामुळे लाकूड कापणे, त्याला हवा तसा आकार देणे, कलाकुसर करणे शक्य होत आहे. त्याचबरोबर लेथ मशीनवर याला तुलनेत कमी वेळ लागत असल्याने व हवा तो परिणाम साधता येत असल्याने ग्राहकही खूश होत आहेत.