लासलगाव व परिसरात शुक्रवारी सायंकाळी मान्सूनपूर्व वादळी पाऊस झाला. या पावसामुळे कांदा व्यापा-यांचे १३ शेड कोसळून त्यामधील हजारो क्विंटल कांदा भिजून नुकसान झाले.
नाशिक – लासलगाव व परिसरात शुक्रवारी सायंकाळी मान्सूनपूर्व वादळी पाऊस झाला. या पावसामुळे कांदा व्यापा-यांचे १३ शेड कोसळून त्यामधील हजारो क्विंटल कांदा भिजून नुकसान झाले.
शेडखाली एका ट्रकसह दुचाकी व चारचाकी अशी २२ वाहने दबली गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले, तर विजेची तार अंगावर पडून दोन जनावरे जागीच ठार होऊन कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
वादळी वा-यामुळे अनेक भागात वृक्ष उन्मळून पडले. तसेच वीजपुरवठाही खंडित झाला होता. टाकळी परिसरात अनेक घरांच्या छतावरील पत्रे उडून संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. तर नगरांमधील बंगल्यांवरील सौरऊर्जेची उपकरणे तसेच बाजार समितीतील टोमॅटो शेडचे पत्रे उडाल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
या पावसाने संदीप जगताप, अक्षय ब्रम्हेचा, पुष्पा ब्रम्हेचा, राजेंद्र कासट, गौरव जैन, अजहर शेख या व्यापा-याचे सहा कांदा शेड पूर्णत: कोसळले तर बाळासाहेब दराडे यांचे दोन, रमेश शिंदे यांचे दोन, अजहर शेख यांचे एक असे पाच कांदा शेडचे नुकसान होऊन यामधील सुमारे ५०० टन अधिक कांदा भिजला. तर टाकळी विचूर परिसरात विजेची तार तुटून शेतातील बैलांवर पडल्याने दोन्ही जनावरे जागीच दगावल्याने एकनाथ शिंदे यांचे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले.