सरकारी वाहनांवरील दिव्यांच्या होणा-या गैरवापराला आळा बसावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेश जाहीर केले आहेत.
रत्नागिरी- सरकारी वाहनांवरील दिव्यांच्या होणा-या गैरवापराला आळा बसावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेश जाहीर केले आहेत. या संदर्भातील याचिकेवर सुनावणी देताना सरकारी वाहनांवरील लाल आणि अंबर दिव्यांची सुविधा मर्यादित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरीम आदेश अनुसरून गृह विभागाने सरकारी अधिसूचनेनुसार सरकारी वाहनांवरील दिवा सुविधेबाबत सुधारित आदेश प्रसिद्ध केले आहेत.
राज्य व केंद्र सरकारच्या अखत्यारीत काम करणा-या विशेष अधिका-यांना सरकारकडून लाल व अंबर दिव्याची विशेष सुविधा पुरवली जाते. मात्र, काही वेळा या सुविधेचा गैरवापर होत असल्याचे आढळते. या गैरवापराला आळा बसावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर ४ एप्रिल रोजी सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयाने दिव्यांची सुविधा मर्यादित करण्याचा निर्णय घेतला.
न्यायालयाने दिलेल्या सुनावणीनंतर वाहनांवरील दिवा सुविधेबाबत सुधारित आदेश प्रसिद्ध करण्यात आले आहेत. सरकारी वाहनांवरील दिव्यांचा गैरवापर होऊ नये, दिवा सुविधा केवळ विहित केलेल्या वाहनांवर कर्तव्य बजावताना वापरण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९च्या नियम ११९ (३) नुसार मोटार वाहन विभाग, पोलिस, अॅम्ब्युलन्स, अग्निशमक दलाच्या गाडया व सैन्य दलाच्या वाहनांना कर्तव्य बजावत असताना सायरनचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
या वाहनांव्यतिरिक्त अन्य वाहनांना सायरन किंवा मल्टी टोन हॉर्नची सुविधा वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. मोटार वाहन अधिनियम १९८८ व त्याखाली तयार करण्यात आलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी प्राधिकृत केलेले पोलिस अधिकारी किंवा इतर प्राधिका-यांनी कोणाच्याही दबावाची पर्वा न करता नियमांची अंमलबजावणी करावी तसेच या नियम व अटींचा भंग करणा-यांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.
वाहनचालकांनी वाहनांवर मल्टी टोन हॉर्न लावले असल्यास ते काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले असून सरकारी वाहनांवरील मल्टी टोन हॉर्न काढून टाकल्याची अधिका-यांनी खात्री करून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. या नियमांचा भंग करणा-या अधिकारी व कर्मचा-यांवर कठोर कारवाईबरोबरच शिस्तभंगाची कारवाईदेखील करण्यात येणार आहे.