सर्वोच्च पदावर विराजमान असलेल्या व्यक्तींच्या गाडीवरच लाल दिवा लावता येईल, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
नवी दिल्ली- सर्वोच्च पदावर विराजमान असलेल्या व्यक्तींच्या गाडीवरच लाल दिवा लावता येतो, अन्य कोणत्याही गाडीवर लाल दिवा लावता येणार नाही, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तींच्या गाडीवरच लाल दिवा लावण्याचा नियम आहे. मात्र सध्या या नियमांचे सर्वत्र उल्लंघन होताना दिसते. आता फक्त राज्यपाल, मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, सरन्यायाधीश अशा पदांवरील व्यक्तींच्या गाडीवरच लाल दिवा लावता येईल. विशेष म्हणजे, लाल दिव्यासोबत सायरन वाजवण्याची परवानगी नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, न्यायाधीश, वरिष्ठ पोलिस अधिकारी आपल्या वाहनांवर सर्रास लाल दिवा लावून फिरतात. त्यांच्यावर त्वरीत बंदी घालावी तसेच रुग्णवाहीका, अग्निशमन दल, पोलिस आणि आपत्कालीन सेवांसाठी निळा दिवा वापरावा लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
वाहनांमध्ये विविध आवाजांचे तसेच संगीतमय हॉर्न वापरण्यासही न्यायालयाने बंदी घातली आहे. याशिवाय कर्णकर्कश प्रेशर हॉर्नवरही बंदी यापूर्वीच घातली आहे. सरकारने या मोटर वाहन कायद्यामध्ये आवश्यक ते बदल करुन नियम मोडणा-यांवर कठोर कारवाईची तरतूद करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे.
तीन महिन्यांत केंद्र आणि राज्य सरकारने कठोर नियमावली करुन त्याची अंमलबजावणी करावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.