सरकारी अधिका-याला लाच देऊ केल्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मुलीविरोधात कारवाई करण्याची मागणी दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांनी केली आहे.
नवी दिल्ली- सरकारी अधिका-याला लाच देऊ केल्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मुलीविरोधात कारवाई करण्याची मागणी दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांनी केली आहे.
निवृत्त आयएएस अधिकारी ओमेश सैगल यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख एस. एस. यादव यांना याप्रकरणी पत्र लिहिले असून केजरीवाल यांच्या मुलीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या पत्रातून केली आहे.
केजरीवालांनी सोमवारीच आम आदमी पक्ष सत्तेवर आल्यापासून राज्यातील भ्रष्टाचार ७०-८० टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा केला होता. यावेळी त्यांनी आपल्या मुलीचे उदाहरणही दिले होते. माझ्या मुलीने जेव्हा एका सरकारी अधिका-याला लाच देऊ केली असता ती घेण्यास त्या अधिका-याने मनाई केल्याचे त्यांनी सांगितले.
केजरीवाल यांच्या मुलीने वाहन परवाना काढण्यासाठी तेथील सरकारी अधिका-याला लाच देऊ केली होती. मात्र त्या अधिका-याने लाच घेण्यास साफ नकार दिला. सरकारी अधिका-याचा प्रामाणिकपणा तपासण्यासाठी आपण तिला हे करायला सांगितल्याचे केजरीवाल म्हणाले.
दरम्यान, याप्रकरणी सैगल यांनी एसीबीच्या प्रमुखांना पत्र लिहून लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ अंतर्गत कारवाई केली जावी अशी मागणी केली आहे.
यासोबतच भगत सिंग क्रांती सेनेचे प्रमुख तजिंदर पाल सिंग बग्गा यांनी या प्रकरणी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. दाखल केलेल्या तक्रारीनुसार योग्य तो तपास केल्यानंतरच एफआयआर दाखल करावा की नाही याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.