प्रजासत्ताक दिनासाठी भारत भेटीवर येणारे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या दौ-यावेळी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांकडून दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता भारतीय लष्कराने गुरुवारी व्यक्त केली आहे.
जम्मू- प्रजासत्ताक दिनासाठी भारत भेटीवर येणारे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या दौ-यावेळी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांकडून दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता भारतीय लष्कराने गुरुवारी व्यक्त केली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील काही शाळा, धार्मिक स्थळे आणि नागरी वस्ती या ठिकाणी दहशताद्यांकडून हल्ले होण्याची शक्यता आहे.
जैशै-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या पाच प्रमुख दहशतवाद्यांना एकाच दिवशी दक्षिण काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यातील चकमकीत ठार केल्याची माहिती १६ कॉर्प्स ‘जीओसी’चे लेफ्टनंट जनरल के. एच. सिंग यांनी दिली.
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील पीर पंजालच्या डोंगर भागातून ३६ लॅन्चिंग पॅडसह २०० दहशतवादी शस्त्रासह भारताच्या हद्दीत घुसण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी पाकिस्तान लष्कराकडून भारतीय चौक्यांवर गोळीबार केला जात आहे. भारतीय लष्कराचे लक्ष्य विचलीत करून दहशतवाद्यांना सहज भारतात प्रवेश करता यावा यासाठी गोळीबार केला जात असल्याचे सिंग सांगितले.
लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांकडून सहजपणे लक्ष्य करता येतील अशा शाळा, धार्मिक स्थळे, लष्करी अधिका-यांची निवासस्थाने आणि अन्य नागरी वस्तीत हल्ले होण्याची शक्यता असल्याचे सिंग म्हणाले.
अमेरिकेचे अध्यक्ष २५ जानेवारी रोजी राजधानी दिल्लीत येणार आहेत. त्यांच्या तीन दिवसांच्या भारत दौ-याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अर्थात पाकिस्तानकडून येणा-या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज असल्याचे सिंग यांना स्पष्ट केले.
पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये १४ ते १५ दहशतवादी कॅम्प सक्रीय असल्याचे ते म्हणाले.