ललित मोदी परदेशात बसून, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ घडवून आणण्याची स्वप्ने पाहत आहे.
सिडनी – भारतीय क्रिकेटमधून हद्दपार करण्यात आलेला आयपीएलचा माजी निलंबित आयुक्त ललित मोदी परदेशात बसून, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ घडवून आणण्याची स्वप्ने पाहत आहे.
ललित मोदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) टक्कर देण्यासाठी नवी आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना जन्माला घालण्याची योजना आखली असून, ही संघटना ऑलिम्पिकशी जोडण्याचा त्याचा मानस आहे.
ऑस्ट्रेलियन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ललित मोदीने प्रथमच त्याच्या या खळबळ उडवून देणा-या योजनेचा खुलासा केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी क्रिकेटींग व्यवस्था उभारायची आहे. या योजनेची ब्लूप्रिंट तयार आहे. या नव्या योजनेच्या उभारणीमध्ये मी सहभागी असून, प्रथमच मी याची जाहीर कबुली देतो.
मी पूर्ण विचार करुन तपशीलवार योजना तयार केली आहे. घाईगडबडीत ही योजना बनवली नसून, अनेक वर्षाच्या मेहनतीनंतर ही योजना आकारास आली आहे असे ललित मोदीने सांगितले.
आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असलेला ललित मोदी २०१० मध्ये भारताबाहेर पळून गेला आता तो लंडनमध्ये स्थायिक आहे. सध्या आयसीसीवर भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांचेच नियंत्रण आहे.
सध्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटची जी व्यवस्था आहे त्यावर मात करण्यात अडचण येणार नाही. नव्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेसाठी काही अब्ज डॉलर्स लागतील पण त्या गुंतवणूकीत काही अडचणी येतील असे मला वाटत नाही असे मोदीने सांगितले.