मानवी हक्कांची टिमकी सतत वाजवणारे अमेरिकेचे लष्कर आणि गुप्तचर संघटना मात्र मानवी हक्क उघडपणे पायदळी तुडवत असतात. अमेरिकन लष्कराने केलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबतच्या वकील अमरित सिंग यांनी तयार केलेल्या अहवालाने मोठी खळबळ उडाली होती. मानवी हक्कांबाबत गेल्या सात वर्षाहून अधिक काळ त्या कार्यरत आहेत. अमरित सिंग यांना मानवी हक्कांबाबत उत्कृष्ट काम केल्याबद्दल अलीकडेच इंडिया अब्रोड पब्लिकेशनतर्फे विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. विशेष म्हणजे अमरित ही पंतप्रधान मनमोहन सिंग यांची धाकटी कन्या आहे. २००३मध्ये अबू गरीब तुरुंगात ठेवलेल्या युद्धकैद्यांच्या छळाच्या कथा उघडकीस आल्या आणि अमेरिकन लष्कराचा खरा अमानवी चेहरा समोर आला. त्यानंतर अमेरिकेने ही तुरुंगरूपी छळछावणी बंद केल्याचे जाहीर केले. मात्र, त्यानंतरही अमेरिकन लष्कराने सातत्याने केलेल्या मानवी हक्क उल्लंघनाच्या बातम्या बाहेर येत होत्या. २००७मध्ये अमरित सिंग आणि जमील जाफर या वकिलांनी लिहिलेले ‘अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ टॉर्चर्स’ हा पुस्तकरूपी अहवाल प्रकाशित झाला आणि पुन्हा खळबळ उडाली. मानवी हक्कांबद्दल जागरूक असलेल्या या दोघा तरुण वकिलांनी अमेरिकन लष्कर आणि लष्करी अधिकाऱ्यांकडून युद्धकैदी, संशयित दहशतवादी यांचा छळ अत्यंत सुनियोजित पद्धतीने कसा केला जातो आणि त्याला अमेरिकन अधिकाऱ्यांची कशी साथ असते, याची माहिती दिली. या दोघांनी माहिती अधिकाराच्या कायद्याखाली या संदर्भातील सरकारी कागदपत्रे, चौकशीसाठी ताब्यात घेण्याचे आदेश देणारी कागदपत्रे, एफबीआयची ई-मेल्स, ऑटोप्सी अहवाल तसेच चौकशीच्या फाइल गोळा केल्या. त्यामुळे अमेरिकन लष्कर, एफबीआय आणि गुप्तचर संस्था ‘सीआयए’ अमेरिका आणि अमेरिकेबरोबर अफगाणिस्तान, इराक, ग्वांटेमाला येथील तुरुंगात युद्धकैदी आणि संशयित दहशतवादी यांच्याशी कशा क्रूरपणे वागतात, याचे वास्तव समोर आले. फेब्रुवारी २०१३मध्ये पुन्हा ‘ग्लोबल टॉर्चर्स : सीआयए सिक्रेट अँड एक्ट्राऑर्डिनरी रेन्डिशन’ हा अहवाल प्रसिद्ध केला आणि अमेरिकेकडून युद्धकैद्यांचा जागतिक छळवाद अजूनही थांबवलेला नाही, हे जळजळीत वास्तव समोर आणले. सुरुवातीला ‘अमेरिकन सिव्हिल लिबर्टी युनियन’ या संस्थेत काही वर्षे वकील म्हणून काम केल्यानंतर अमरित सिंग सध्या न्यूयॉर्कमधील ‘ओपन सोसायटी जस्टीस इनेशिएटीव्ह’ या संस्थेत काम करत आहेत. तेथे त्या राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवादविरोधी कारवाया या विषयावरील वरिष्ठ कायदेशीर अधिकार म्हणून कार्यरत आहेत. इंग्लंडच्या केंब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील येल विद्यापीठातून अर्थशास्त्रातून बीए, एमफिल आणि कायद्याची पदवी मिळवली. मनमोहन सिंग यांच्या तीनही कन्या आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. हे करताना ते जाणीवपूर्वक प्रसिद्धीपासून लांब राहून स्वत:च्या कामातच आनंद मानतात. मोठी कन्या उपिंदर सिंग दिल्लीत इतिहासाच्या प्राध्यापक आहेत. द्वितीय कन्या दमन या लेखिका आहेत. अमेरिकेत मानवी हा अत्यंत जिव्हाळय़ाचा विषय असतो. अशा विषयात अमेरिकन सरकार आणि प्रशासनाला आपली दखल घ्यायला अमरित सिंग यांनी भाग पाडले आहे.