नरक चतुर्दशी व लक्ष्मी-कुबेर पूजन मंगळवारी, १३ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी आहे. लक्ष्मीपूजन प्रदोषकाळी करायचे असते.
मुंबई (प्रतिनिधी) – नरक चतुर्दशी व लक्ष्मी-कुबेर पूजन मंगळवारी, १३ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी आहे. लक्ष्मीपूजन प्रदोषकाळी करायचे असते. मंगळवारी प्रदोषकाळ सायंकाळी ६ वाजल्यापासून रात्री ८ वाजून ३३ मिनिटांपर्यंत आहे. हाच लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त असून, या वेळी लक्ष्मीचे प्रतीक असणा-या झाडूची पूजा करण्याची प्रथा असल्याचे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
‘केवळ पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे, तर सन्मार्गाने मिळवलेला पैसा आणि सन्मार्गासाठी खर्च होणारा पैसा यालाच लक्ष्मी म्हणतात. जेथे स्वच्छता, समाधान, सौंदर्य, रसिकता, उद्योगप्रियता, श्रम असतील तिथे लक्ष्मी आकर्षित होते. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कीर्तिलक्ष्मी, विजयलक्ष्मी, राज्यलक्ष्मी ही लक्ष्मीची आठ रूपे आहेत,’ असे सोमण यांनी सांगितले.