दिल्ली उच्च न्यायालयातील पहिल्या महिला मुख्य न्यायमूर्तीपदी गोरला रोहिणी यांची सोमवारी नियुक्ती करण्यात आली.
नवी दिल्ली – दिल्ली उच्च न्यायालयातील मुख्य न्यायमूर्तीपदी गोरला रोहिणी यांची सोमवारी नियुक्ती करण्यात आली. न्यायमूर्ती एन. व्ही.रामण यांच्या नियुक्तीनंतर हे पद रिक्त होते. सोमवारी न्यायमूर्ती रोहिणी यांनी पदभार स्वीकारला. दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती या पदी विराजमान झालेल्या गोरला रोहिणाी या पहिल्या महिला आहेत.
दिल्लीचे नायाब राज्यपाल नजीब जंग न्यायमूर्ती जी.रोहिणी यांना दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ दिली. ‘रोहिणी यांची मुख्य न्यायमूर्ती या पदी नियुक्ती होणे हे महिला सक्षमीकरणाचे मोठे उदाहरण आहे. रोहिणी यांचा आदर्श नक्कीच देशातील महिलांना प्रेरणा देणारा ठरेल’, असे राज्यपाल नजीब जंग यावेळी म्हणाले.
न्यायमूर्ती रोहिणी यांनी हैदराबादमधील ओस्मानिया विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. तर विशाखापट्टनम येथील आंध्र प्रदेश विद्यापीठातून त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहे. दिल्ली उच्च न्यायालयातील ४० न्यायमूर्तींपैकी त्या १० व्या महिला न्यायमूर्ती आहेत. १९८० मध्ये त्यांनी वकिलीला सुरुवात केली. १९९५ मध्ये त्यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली.