मागच्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका शशिकला मालदी यांचा मृत्यू झाला आहे.
नवी मुंबई – नेरूळमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका शशिकला मालदी या २३ सप्टेंबरपासून बेपत्ता होत्या. त्याच दिवशी गोवंडी रेल्वे मार्गालगत एक मृतदेह आढळून आला होता.
हा मृतदेह मालदी यांचा असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांनी कोणत्या कारणाने आत्महत्या केली याचा शोध पोलीस घेत आहेत. प्रभागातील काही नागरिकांनी मालदी यांच्या विरोधात माहिती अधिकाराखाली माहिती मागविली होती. यामुळे त्या राजकीय तणावात होत्या. आत्महत्येला हा प्रकार जबाबदार आहे का, याची चाचपणी पोलीस करीत असून नगरसेविकेच्या आत्महत्येच्या घटनेने खळबळ माजली आहे.
नेरूळ प्रभाग क्रमांक ८८च्या नगरसेविका शशिकला मालदी या राष्ट्रवादी पक्षाकडून पाच महिन्यांपूर्वी निवडून आल्या होत्या. महिला अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या प्रभागामधून त्या निवडून आल्या होत्या.
त्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची सहा महिन्यांची मुदत नजीक आली असल्याने देखील मालदी या तणावाखाली असल्याने नगरसेवक पद रद्द होण्याची भीती सतावत होती. या अनुषंगाने स्थानिक नागरिकांनी माहिती अधिकाराखाली मालदी यांच्याविरोधात माहिती मागविली होती. अशी तक्रार मालदी यांच्या मुलीने पोलिसांकडे केली आहे.
यामध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याबाबतची माहिती असल्याचे समोर येत आहे. या दिशेने पोलीस तपास करीत असून ही माहिती कोणी मागवली याची माहिती पोलीस गोळा करीत आहेत. त्यानंतर त्यांची चौकशी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. गणेशोत्सवामध्ये मालदी यांचा काही कार्यकर्त्यांशी वाद झाला होता.
प्रभागातील विरोधकांनी एकत्रित येऊन गणेश विसर्जन मिरवणुकीला परवानगी देऊ नये यासाठी थेट नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये निवेदन दिले होते. या वादाबाबत देखील पोलीस माहिती घेत आहे. दरम्यान काही पदाधिकारी मालदी यांच्यावर दबाव आणत असल्याचे देखील समजते आहे.
दरम्यान, शशिकला मालदी यांचा मृतदेह गोवंडीच्या रेल्वे मार्गावर आढळून आला. त्यामुळे ही आत्महत्या रेल्वेमधून उडी मारून केल्याचा कयास व्यक्त केला जात असून या आत्महत्येप्रकारणी रेल्वे पोलिसांकडे नोंद करण्यात आली आहे. त्या बेपत्ता झाल्याची नोंद नेरूळ पोलिसांकडे करण्यात आली आहे.
मालदी यांच्याविरोधात निवडणूक लढवलेल्या तीन उमेदवारांनी माहिती अधिकार टाकल्याची तक्रार त्यांच्या मुलीने केली आहे. मालदी यांच्या पतीला अर्धागवायूचा झटका आला आहे. मुलीचे शिक्षण झाले असून ती रोजगारासाठी प्रयत्न करीत आहे.
दरम्यान, शिवसेनेकडून मालदी यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी दिली. माजी मंत्री गणेश नाईक यांनी देखील पोलिसांची भेट घेऊन याप्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने करण्याची मागणी केली आहे. आमदार मंदा म्हात्रे यांनी या प्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी केली आहे.