रेल्वेच्या मोठया प्रकल्पांवर नजर ठेवण्यासाठी ‘ड्रोन’चा वापर करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
नवी दिल्ली- रेल्वेच्या मोठया प्रकल्पांवर नजर ठेवण्यासाठी ‘ड्रोन’चा वापर करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याबाबत तातडीने पावले उचलली जाऊ शकतील.
रेल्वेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’ (डीएफसी) या प्रकल्पावर देखरेख करण्यासाठी ड्रोन तैनात केले आहे. तसेच रेल्वे अपघातानंतर परिस्थिती हाताळण्यासाठी ‘ड्रोन’चा वापर केला जाईल.
‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’च्या बागेघा व श्रीमाधोपूर या ४२ किलोमीटरच्या पट्टयाच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. तसेच बिहारच्या सासाराम ते दुर्गावती या ५६ किलोमीटर मार्गाच्या कामासाठी ‘ड्रोन’ वापरले जात आहे, असे डीएफसीचे व्यवस्थापकीय संचालक आदेश शर्मा यांनी सांगितले.
आम्ही तीन दिवस या प्रकल्पाचे व्हीडिओ शूटिंग केले. त्याचा स्थितीदर्शक अहवालाचे विश्लेषण सुरू आहे. या पद्धतीमुळे प्रकल्पाचा अहवाल आता तातडीने मिळणार आहे. विशेष म्हणजे कार्यालयात बसून ही माहिती मिळू शकेल, असे शर्मा म्हणाले.
हे ड्रोन आम्ही खासगी कंपनीकडून घेतले आहे. याचा खर्च प्रति किलोमीटर तीन हजार रुपये आहे. रेल्वेचे सध्या १७० प्रकल्प सुरू आहेत. त्यात दुहेरीकरण, नवीन मार्ग टाकणे आदींचा समावेश आहे. ड्रोनमुळे प्रकल्पाची प्रत्यक्ष माहिती मिळू शकते, असे ते म्हणाले.