निवडणुकीच्या प्रचारासाठी भित्तीपत्रके, फलक आणि झेंडे लावून रेल्वे स्थानकांचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी मध्य रेल्वेने प्रत्येक कामगार संघटनेला पाच हजार रुपयांचा दंड भरण्याची नोटिस बजावली आहे.
मुंबई- रेल्वे कामगार संघटनांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी सीएसटी, दादर, कुर्ला, ठाणे व अन्य स्थानकांत भित्तीपत्रके, फलक आणि झेंडे लावून स्थानकांचे विद्रुपीकरण केले आहे. या प्रकरणी मध्य रेल्वेच्या मुख्य कार्मिक अधिका-यांनी प्रत्येक कामगार संघटनेला पाच हजार रुपयांचा दंड भरण्याची नोटिस बजावली आहे. परंतु, कामगार संघटनांनी या नोटिशीला केराची टोपली दाखवत दंड न भरण्याचा पवित्रा घेतला आहे. प्रचाराचे साहित्य कुठे आणि किती लावावे, याचा धोरणात्मक निर्णय रेल्वे प्रशासनाने घेऊन त्याची अंमलबजावणी करावी आणि त्याची माहिती सर्व कामगार संघटनांना द्यावी, अशी मागणी या संघटनांनी केली आहे.
सीएसटी स्थानकाला जागतिक वारसाचा दर्जा देण्यात आला आहे. पण तरीही या स्थानकात अनेक ठिकाणी ‘नॅशनल रेल्वे मजदूर युनियन,’ ‘सेंट्रल रेल्वे मजदूर संघ,’ ‘रेल्वे कामगार सेना,’ ‘मनसे रेल्वे कामगार सेना’ आदी संघटनांनी फलक, भित्ती चित्रे चिटकवून त्याचे विद्रुपीकरण केले आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य कार्मिक अधिका-यांनी या संघटनांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड भरण्याची नोटिस अतिरिक्त विभागीय व्यवस्थापकांमार्फत बजावली आहे. मात्र, एकाही संघटनेने अजूनपर्यंत दंड भरलेला नाही, अशी माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिली.
रेल्वेकडून दंड भरण्याची नोटिस मिळाली आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणताच निर्णय घेतलेला नाही, असे ‘एनआरएमयू’, ‘सीआरएमएस’च्या पदाधिका-यांनी सांगितले. २ मे रोजी मतदानाचा निकाल लागणार आहे. त्यानंतर प्रचाराचे साहित्य उतरवण्यात येईल. त्यामुळे दंड भरण्याची गरजच काय, असा प्रश्न ‘एनआरएमयू’चे वेणू नायर यांनी उपस्थित केला. प्रशासनाने दंड भरण्याची सक्ती केल्यास तोही भरण्याची संघटनेची तयारी आहे, असा दावा त्यांनी केला. निवडणुकांच्या काळात सर्वच संघटना ठिकठिकाणी प्रचाराचे साहित्य लावतात. यामुळे सर्वानी दंड भरल्यास आम्ही तो भरण्याबाबत विचार करू, असे ‘सीआरएमएस’च्या एका पदाधिका-याने सांगितले.
‘प्रचाराचे साहित्य उतरवण्याची नोटिस मुख्य कार्मिक अधिका-यांकडून मिळताच आम्ही सीएसटी स्थानकातील भित्तीपत्रके, झेंडे आदी प्रचार साहित्य काढून टाकले आहे,’ असे रेल्वे कामगार संघटनेचे उपाध्यक्ष योगेश जाधव यांनी सांगितले. निवडणुकीच्या काळात प्रचार साहित्य लावण्याविषयी रेल्वे प्रशासनाने प्रचाराआधीच धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे आणि त्याची माहिती कामगार संघटनांना द्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.