केंद्रीय रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांच्या संपत्तीत गेल्या पाच महिन्यांत दुपटीने वाढ झाल्याचे ‘इलेक्शन वॉच’ने आपल्या अहवालात म्हटले आहे.
नवी दिल्ली – केंद्रीय रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांच्या संपत्तीत गेल्या पाच महिन्यांत दुपटीने वाढ झाल्याचे ‘इलेक्शन वॉच’ने आपल्या अहवालात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार सर्व मंत्र्यांना पंतप्रधान कार्यालयाकडे संपत्तीचा तपशील देणे आवश्यक आहे. त्यामुळेच कोणाकडे किती ‘माया’ जमली हे स्पष्ट झाले आहे.
मोदी यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांच्या संपत्तीमध्ये घट झाल्याचेही ‘नॅशनल इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ने आपल्या अहवालात म्हटले आहे. मात्र, मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या संपत्तीत मात्र चांगलीच वाढ झाल्याचे या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.
सदानंद गौडा यांनी लोकसभा निवडणुकीवेळी आपल्या उमेदवारी अर्जासोबत जे प्रतिज्ञापत्र सादर केले होते, त्यात ९.८८ कोटी एवढी संपत्ती असल्याचा उल्लेख केला होता. आता रेल्वेमंत्री झाल्यानंतर पाच महिन्यांत त्यांच्या संपत्तीचा आकडा दुपटीने वाढून २०.३५ कोटींच्या घरात पोहोचला आहे. म्हणजेच गेल्या पाच महिन्यांत गौडा यांची संपत्ती १०.४६ कोटींनी वाढली आहे.
गौडा यांच्यानंतर संपत्तीवाढीच्या बाबतीत केंद्रीय मंत्री पी. राधाकृष्णन यांचा क्रमांक लागतो. लोकसभा निवडणुकीवेळी राधाकृष्णन ४ कोटी ९ लाख रुपयांचे धनी होते. त्यामध्ये आता ३ कोटींची भर पडली आहे. त्यांची संपत्ती आता ७ कोटी ७ लाखांवर पोहोचली आहे. सर्वाधिक घट झालेल्या मंत्र्यांमध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचा नंबर लागतो.
लोकसभा निवडणुकीवेळी सुषमा यांची संपत्ती १७.५५ कोटी होती. त्यात आता ३.८९ कोटींची घट झाली असून सुषमा यांच्याकडे सध्या १३.६५ कोटींची संपत्ती आहे. जनरल व्ही. के. सिंग यांच्याकडे ४.११ कोटींची संपत्ती होती, हा आकडा आता ३.१३ कोटींनी घसरून ९८.२७ लाखांवर आला आहे.