रेल्वेच्या लांब पल्यांच्या गाडय़ांच्या स्वच्छतेकरता ‘क्लीन माय कोच’ या सेवेचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले
मुंबई – रेल्वेच्या लांब पल्यांच्या गाडय़ांच्या स्वच्छतेकरता ‘क्लीन माय कोच’ या सेवेचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले. व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे हे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा, रेल्वे बोर्ड अध्यक्ष ए. के. मित्तल आणि सदस्य हेमंत कुमार उपस्थित होते. यावेळी पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट येथील मुख्यालयात महापौर स्नेहल आंबेकर, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक जी. सी. अग्रवाल आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एस. के. सूद उपस्थित होते.
मुंबई विभागातील लांब पल्यांच्या २८ गाडय़ांमध्ये ही सुविधा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. या सेवेकरता प्रवाशांना मोबाईलवरून /फउछएअठ असे टाईप करून पुढे पीएनअर नंबर टाईप करून ५८८८८ या क्रमांकावर एसएमएस पाठवल्यानंतर अध्र्या तासाच्या आत डबा साफ केला जाणार आहे. ही सेवा सध्या केवळ आरक्षित प्रवाशांसाठी सुरू असून पुढील काळात द्वितीय श्रेणीच्या अनारक्षित प्रवाशांसाठी देखील सेवा पुरवण्याचा विचार रेल्वे प्रशासन करीत आहे. याशिवाय पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल या महत्त्वाच्या स्थानकांत व्हॅक्युम टॉयलेट लावण्याचा विचार करण्यात येत आहे. सध्या प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असून हा प्रयोग यशस्वी ठरल्यास व्यापक प्रमाणात योजना राबवण्याचा विचार असल्याचे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक सी.जी. अग्रवाल यांनी सांगितले.