काम संपवून बदलापूरला घरी निघालेले मध्य रेल्वेचे सहाय्यक इंजिन चालक सुभाषचंद्र यांना चोरटय़ांनी बेदम मारहाण करून त्यांच्याकडील चार हजार रुपयांची रोकड मोबाइल संच, अंगठी लुटल्याची घटना कल्याण लॉबीजवळ सोमवारी सायंकाळी घडली.
मुंबई – काम संपवून बदलापूरला घरी निघालेले मध्य रेल्वेचे सहाय्यक इंजिन चालक सुभाषचंद्र यांना चोरटय़ांनी बेदम मारहाण करून त्यांच्याकडील चार हजार रुपयांची रोकड मोबाइल संच, अंगठी लुटल्याची घटना कल्याण लॉबीजवळ सोमवारी सायंकाळी घडली.
चोरटय़ांनी ही लूट केल्यानेच त्यांना एका ठिकाणी जबरदस्तीने डांबून त्यांचे ‘एटीएम’काढून घेतले. त्यावेळी त्यांचा ‘पासवर्ड’ विचारून त्यांनी त्याच्या खात्यातील १४ हजार ७०० रुपये घेऊन पसार झाले. चोरट्यांच्या मारहाणीत जखमी झालेल्या सुभाषचंद्र यांच्यावर कल्याणच्या रेल्वे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेचा निषेध नोंदवत कल्याण लॉबीतील मोटरमन आणि चालकांनी सोमवारी दोन तास काम बंद केले होते. परिणामी सीएसटीकडे येणा-या लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. सुभाषचंद्र यांना मारहाण करून त्यांच्या एटीएम कार्डातून पैसे काढल्याचे त्यांनी ‘प्रहार’ला सांगितले.
या घटनेची माहिती देण्यासाठी सुभाषचंद्र यांनी कोळसेवाडी पोलिस ठाणे गाठले पण त्यांची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेण्यास नकार दिला. यामुळे त्यांनी रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांना गाठून ही घटना त्यांच्याकडे नोंदवली. मात्र पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचे समजताच कल्याण लॉबीतील मोटरमन, मेल-एक्स्प्रेसचे लोको पायलट, सहाय्यक लोको पायलट यांनी रात्री साडेआठ ते दहा वाजेपर्यंत काम बंद ठेवले होते.
याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध दरोडय़ाचा गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी एटीएम सेंटर आणि बँकेचे कार्यालय बंद असल्याने तेथून कोणतेही धागेदोरे मिळाले नाहीत, असे कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जगदीश नोव्हळकर यांनी ‘प्रहार’ला सांगितले.