पटेल आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलच्या सुटकेसाठी गुजरातमध्ये आंदोलन करण्यात आले असून यामध्ये दोन पोलिसांसह २४जण जखमी झाले आहेत.
मेहसाणा- पटेल आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलच्या सुटकेसाठी गुजरातमध्ये आंदोलन करण्यात आले असून यामध्ये दोन पोलिसांसह २४जण जखमी झाले आहेत. रविवारी सकाळी गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात हे आंदोलन झाले.
फोटो पहाण्यासाठी येथे क्लिक करा
हार्दिक पटेलची तुरुंगातून सुटका व्हावी, या मागणीसाठी आंदोलकांनी रॅलीचे आयोजन केले होते. मात्र, या रॅलीला परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे हिंसाचार सुरू झाला.
पोलिसांनी रॅली रोखल्यामुळे आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरूवात केली तर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांडया फोडल्या, लाठीचार्जही केला.
यामध्ये पटेल समाजाचे नेते लालजी पटेल जखमी झाले आहेत तर दगडफेकीत काही पोलीसही जखमी झाले आहेत. परवानगी नसतांना रॅली काढल्यामुळे पोलिसांनी कायदेशीररित्या कारवाई केल्याचे मेहेसाणाच्या जिल्हा आधिका-यांनी सांगितले.
शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोक-यांमध्ये आरक्षण मिळावे यासाठी मागच्यावर्षीपासून पटेल समाजाचे आंदोलन सुरु आहे. २३ वर्षांचा हार्दिक पटेल या आंदोलनाचे नेतृत्व करत असून, त्याला मागच्यावर्षी ऑक्टोंबर महिन्यात राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली. तेव्हापासून तो तुरुंगात बंद आहे.