जगभरात ७ मे हा जागतिक ‘लेव्हल क्रॉसिंग डे’ म्हणून साजरा केला जातो. या वर्षी पश्चिम रेल्वेही हा दिन साजरा करणार असून, रूळ न ओलांडण्याबाबत प्रवाशांमध्ये जनजागृती करणार आहे.
मुंबई- जगभरात ७ मे हा जागतिक ‘लेव्हल क्रॉसिंग डे’ म्हणून साजरा केला जातो. या वर्षी पश्चिम रेल्वेही हा दिन साजरा करणार असून, रूळ न ओलांडण्याबाबत प्रवाशांमध्ये जनजागृती करणार आहे. विशेष म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून याबाबत जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत चंद्रायन यांनी दिली आहे.
‘लेव्हल क्रॉसिंग डे’निमित्त एक आठवडा पश्चिम रेल्वेवर जनजागृती मोहीम राबवली जाईल. ‘लेव्हल क्रॉसिंग’मुळे देशात ६६ टक्के अपघात होतात. हे अपघात टाळता येणे शक्य आहे. त्यासाठी पथनाटय़े आणि शाळा-महाविद्यालयांत व्याख्यानांद्वारे याबाबत प्रबोधन केले जाणार आहे.
रूळ ओलांडणे किती धोकादायक आहे हे सामाजिक संस्थांच्या मदतीने पटवून दिले जाणार आहे. मुंबईत अंधेरी, जोगेश्वरी आणि गोरेगाव या ठिकाणी विशेष मोहीम राबवली जाईल. अनेक वेळा फाटक बंद असतानाही प्रवासी रूळ ओलांडतात. शिवाय अनेकदा दुचाकी गाडय़ाही नेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे असे अपघात टाळण्यासाठी हे अभियान राबवले जाणार असल्याचे चंद्रायन यांनी सांगितले.