मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावरील वासिंद-आसनगाव रेल्वे स्थानकांदरम्यान झाड कोसळल्याने रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाल्याची घटना बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली.
शहापूर – मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावरील वासिंद-आसनगाव रेल्वे स्थानकांदरम्यान झाड कोसळल्याने रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाल्याची घटना बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. मात्र कोसळलेल्या झाडावर मधमाश्यांचे पोळे होते. यातील मधमाश्यांनी झाड हटविण्यास गेलेल्या रेल्वे कर्मचा-यांवर हल्ला केल्याने रात्री उशीरापर्यंत रेल्वेसेवा पूर्ववत होऊ शकली नव्हती.
वासिंद-आसनगावदरम्यान गेट क्रमांक ६५ जवळील ओव्हरहेड लाईनवर दोन्ही रुळांवर हे मोठे झाड कोसळले. यानंतर वीजपुरवठा खंडित झाल्याने तांत्रिक पथकाने तो सायंकाळी उशिरा नीट केला आणि कसा-याकडे जाणारी एक मार्गिका सुरू करत गोदान एक्सप्रेस सोडली. तर कसा-याकडे जाणारी लोकल सेवा आणि मुंबईकडे जाणारी पूर्ण वाहतुक मात्र रात्री उशिरापर्यंत बंदच होती.
या प्रकारामुळे सायंकाळी घरी जाण्यास निघालेल्या चाकरमान्यांचे रात्रीपर्यंत प्रचंड हाल झाले. मुंबईपासून ठाणे, डोंबिवली, कल्याण अशा सर्वच स्थानकांवर प्रवाश्यांची तोबा गर्दी झाली होती. या घटनेमुळे अनेक लोकल रद्द करण्यात आल्या. तर मुळ स्थानकातून सुटलेल्या काही लांब पल्ल्याच्या गाडय़ा रस्त्यातच थांबवून ठेवण्यात आल्या. यामुळे त्रासलेल्या प्रवाश्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला.