चीनने सलग तिस-या सत्रात युआनचे अवमूल्यन केल्याने धास्तावलेल्या चलन बाजारात रुपयाचा गुरुवारीही थरकाप उडाला.
मुंबई- चीनने सलग तिस-या सत्रात युआनचे अवमूल्यन केल्याने धास्तावलेल्या चलन बाजारात रुपयाचा गुरुवारीही थरकाप उडाला. सलग सात सत्रांत उतरणीला लागलेल्या रुपयाचे डॉलरसमोर ३२ पैशांनी अवमूल्यन होऊन तो ६५.१०वर बंद झाला. दोन वर्षातील हा नवा नीचांकी स्तर ठरला.
रुपयाने सुरुवात सकारात्मक केली होती. निर्यातदारांकडून डॉलरची विक्री आणि बाजाराची उसळी याचा रुपयाला फायदा झाला. मात्र बँका आणि आयातदारांनी डॉलरच्या खरेदीवर जोर दिल्याने रुपया बघता-बघता ६५.२३वर घसरला आणि अखेरीस ६५.१० वर बंद झाला.
गेल्या सात सत्रांमध्ये रुपयाचे १३६ पैशांनी अवमूल्यन झाले. चीनची मध्यवर्ती बँकेने गुरुवारीही आपल्या चलनाचे मूल्य १.११ टक्क्यांनी घटवले. रुपयात कमजोरी कायम राहिली असून दिवसभरात अध्र्या टक्क्याचे अवमूल्यन झाले. युआनच्या घसरणीमुळे मजबूत होणा-या डॉलरचा रुपयाला फटका बसत असल्याचे प्रमित ब्रह्मभट यांचे म्हणणे आहे.
रुपया आणखी कमजोर होणार
चिनी युआनच्या घसरणीचा रुपयावर थेट परिणाम होणार नसला तरी येत्या काळात रुपयातील कमजोरी कायम राहण्याची शक्यता सिटीग्रुपने वर्तवली आहे. युआनचे मूल्य अनपेक्षितपणे घटवल्याने गुंतवणूकदार बाजारातून काढता पाय घेण्याची शक्यता आहे. यामुळे रुपयातील गुंतवणुकीला मोठा फटका बसेल.
इतर विकसनशील देशांच्या तुलनेत रुपया वरचढ असला तरी डॉलरसमोरील घसरण सुरच राहण्याची शक्यता यात वर्तवली आहे.
युआनचे मूल्य आणखी घटवले
शांघाय- चीनने सलग तिस-या दिवशी युआनचे मूल्य घटवले आहे. चिनी चलनाचे मूल्य १.११ टक्क्याने घटवून डॉलरसमोर ६.४०१० युआनपर्यंत कमी केले. या चलनातील चढउतारांच्या पार्श्वभूमीवर दुस-या क्रमांकाच्या चिनी अर्थव्यवस्थेच्या स्वास्थ्याबाबत जगभरात साशंकता निर्माण झाली आहे.
वस्त्रोद्योग निर्यातीला फटका बसणार
युआनच्या अवमूल्यनाचा देशाच्या वस्त्रोद्योग निर्यातीला जबरदस्त फटका बसण्याची शक्यता आहे. याबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारात कपडय़ांचा व्यवसाय आणखी थंडावण्याची शक्यता औद्योगिक संघटना टेक्सप्रोसिलचे अध्यक्ष आर.के. दालमिया यांनी व्यक्त केली आहे.
युआन अवमूलनामुळे स्पर्धात्मक वातावरणाची हानी
चीनने युआनचे मूल्य अचानक घटवण्याची भूमिका धोकादायक असल्याचे मत एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी यांनी गुरुवारी व्यक्त केले. यामुळे वेळीच पावले उचलली नाहीत रि स्पर्धात्मक वातावरणाची मोठी हानी होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
याचा सर्वच देशांच्या निर्यातीवर परिणाम होणार आहे. चीनची उत्पादने आधीच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्वस्त आहेत. चलनाच्या अवमूल्यनामुळे ती आणखी स्वस्त होऊन स्पर्धा करणे मुश्कील होईल आणि याचा परिणाम हा दूरगामी असेल, असा इशारा त्यांनी दिला.