तीन वर्षीय चिमुरडीचा ‘रुट कॅनल’ करताना भुलीचा ओव्हरडोस झाल्याने मृत्यू झाल्याची घटना कोथरूडमध्ये घडली.
पुणे- दात किडल्यामुळे उपचारांसाठी दवाखान्यात नेलेल्या सानवी रेवतकर तीन वर्षीय चिमुरडीचा ‘रुट कॅनल’ करताना भुलीचा ओव्हरडोस झाल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी कोथरूडमध्ये घडली.
पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉ. अंकुर कुलकर्णी यांच्याविरुद्ध हलगर्जीचा तसेच सानवीच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
रेवतकर आणि त्यांची पत्नी सॉफ्टवेअर इंजिनीअर आहेत. त्यांची मुलगी सानवीच्या चार दाढा आणि एक दात किडल्याने उपचारासाठी डॉ. कुलकर्णी यांच्या फॅमिली डेंटल केअर दवाखान्यात नेले होते. सानवीवर २६ जूनपासून उपचारांना सुरुवात केली होती.
२६ जून रोजी तिच्या तीन दाढांत सिमेंट भरण्यात आले, तर २७ तारखेला दातावर उपचार केले होते. तिचे २९ तारखेला रुट कॅनल करण्यात येणार होते. त्यानुसार पालकांनी तिला कुलकर्णी यांच्या दवाखान्यात नेले. तिला कुलकर्णी यांनी भूल दिली. त्यासाठी लिग्नोक्स हे इंजेक्शन दिले होते.
रुट कॅनलची प्रक्रिया सुरू केल्यानंतर हायड्रोजन पॅरॉक्साईडच्या साहाय्याने दातांतील घाण काढत असतानाच; सानवीला खोकला आला. डॉक्टरांनी निरंजन यांना तिला उचलून घ्यायला सांगितले. दरम्यान, सानवीने वडिलांच्या खांद्यावर मान टाकत डोळे पांढरे केले.
निरंजन यांनी तातडीने तिला शेजारीच असलेल्या डॉक्टर सुमीत आणि स्वप्ना बिटकर यांच्या लहान मुलांच्या दवाखान्यात नेले. तेथे तिला कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यात आला, परंतु तिची प्रकृती बिघडल्यामुळे एरंडवण्यातील खासगी रुग्णालयात हलवले, मात्र तिचा मृत्यू झाला.