क्रिकेटच्या मैदानावरील रंजक घडामोडी
१९८३
गावस्करांनी मोडला ब्रॅडमन यांचा विक्रम.. वेस्ट इंडिजविरुद्धच्या चेन्नई कसोटीत शतक झळकवत विक्रमादित्य सुनील गावस्कर यांनी सर डोनाल्ड बॅडमन यांचा २९ शतकांचा विक्रम मागे टाकला. गावस्कर यांनी त्यावेळी २३६ धावांची नाबाद खेळी केली. त्यावेळेस भारतातर्फे नोंदवलेली ती सर्वाधिक वैयक्तिक खेळी होती.
१९०५
भारताचे माजी कर्णधार, क्रिकेट प्रशासक आणि विजयनगरचे महाराजकुमार सर गजपतयराज विजय आनंद (१९०५-६५) यांचा जन्म. अत्यंत वाईट कसोटीपटू अशी त्यांची ओळख आहे. क्लब दर्जाचे क्रिकेटपटू असूनही राजे रजवाडय़ांच्या घराण्यात जन्मलेले म्हणून तसेच राजकारणाचा वापर करून त्यांनी संघात स्थान मिळवले. पुढे १९३६ मध्ये इंग्लंड दौऱ्यात त्यांनी कर्णधारपदही भूषवले. गजपतराय आनंद यांच्यामुळे लाला अमरनाथ, सी. के. नायडू अशा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंची कारकीर्द संपुष्टात आली. प्रत्यक्ष कसोटीदरम्यान ‘महान फलंदाज विजय र्मचट यांना धावबाद कर,’ असे त्यांनी अन्य सलामीवीर मुश्ताक अली यांनी बजावले होते.
१९२६
इंग्लंडचे माजी कसोटीपटू डोनाल्ड कार यांचा जन्म. केवळ दोन कसोटी सामनेच त्यांच्या वाटय़ाला आले. दुस-या आणि अंतिम कसोटीत कार कर्णधारही बनले. निवृत्तीनंतर आयसीसी सामनाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले. एका डावात ११०७ धावा.. क्रिकेटमध्ये एका डावात एक हजारहून अधिक धावा म्हणजे कठीण गोष्ट वाटते. मात्र ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया संघाने इतक्या धावा करण्याची करामत दोनदा साधली. ८५ वर्षापूर्वी याच दिवशी मेलबर्नवर न्यू साउथ वेल्सविरुद्ध ११०७ धावा करत त्यांनी स्वत:चाच विक्रम मागे टाकला. चारच वर्षापूर्वी याच मैदानावर टास्मानियाविरुद्ध व्हिक्टोरियाने १०५९ धावा केल्या होत्या. व्हिक्टोरियाला अकराशे सात धावांपर्यंत पोहचवण्यात बिन पॉन्सफर्ड (३५२), जॅक रायडर (२९५) यांचा मोलाचा वाटा होता.
१९३४
महिलांच्या पहिल्या-वहिल्या कसोटी सामन्याला ब्रिस्बेनमध्ये सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियावर नऊ विकेटनी विजय मिळवत इंग्लंडने तो सामना जिंकला.
१९३५
अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्याची सूचना करणारे दक्षिण आफ्रिकेचे हरबर्ट वेड पहिले क्षेत्ररक्षण कर्णधार ठरले. विजयासाठी १२५ धावा असताना आणि आठ विकेट शिल्लक असलेल्या प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाला ती कसोटी जिंकण्याची संधी संधी होती. मात्र वादळी पावसामुळे जोहान्सबर्ग कसोटी अनिर्णित राहिली.
१९४०
क्वीन्सलँडविरुद्ध दुस-या डावात १११ धावांची खेळी करतानाच न्यू साउथ वेल्सच्या आर्थर मॉरिस यांनी दोन्ही डावांत शतक ठोकण्याचा विक्रम केला. डोमेस्टिक क्रिकेट पदार्पणात दोन्ही डावांत शतक झळकवणारे मॉरिस पहिले क्रिकेटपटू ठरले.
१९४१
पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि संघव्यवस्थापक इंतिखाब आलम यांचा जन्म. पदार्पणातील कसोटीत (१९५९-६०, कराची) पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याची करामत त्यांनी साधली आहे. लेगस्पिनर आलम यांच्या नावावर १२५ विकेट आहेत.
२००३
भारताविरुद्धच्या मेलबर्न कसोटीतील द्विशतक रिकी पाँटिंगचे (नाबाद २१२) त्या वर्षातील तिसरे द्विशतक ठरले. डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर एका वर्षात तीन द्विशतके ठोकण्याची करामत त्याने साधली. या द्विशतकापूर्वी पाँटिंगने वेस्ट इंडिजविरुद्ध २०६ आणि भारताविरुद्ध अॅडलेडमध्ये २४२ धावांची चमकदार खेळी केली होती.
२००६
इंग्लंडचे सर्वात वयस्कर कसोटीपटू मिचेल (मँडी) इनेस यांचे ९२व्या वर्षी निधन झाले.