जाणून घ्या क्रिकेटच्या इतिहासात २४ जानेवारी रोजी घडलेले रंजक किस्से
१९५४
ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार किम ह्यूज यांचा जन्म. ते शैलीदार फलंदाज होते. १९८० मधील शताब्दी कसोटी सामन्यात त्यांनी ११७ आणि ८४ धावा केल्या. पाचही दिवस ते खेळपट्टीवर होते आणि प्रत्येक दिवशी एक षटकारही ठोकला.
१९५६
भारतीय महिला क्रिकेटमधील एक प्रसिद्ध नाव डायना एडलजी यांचा जन्म. त्यांनी २० कसोटी सामन्यांमध्ये भारतातर्फे सर्वाधिक ६३ विकेट घेतल्या. निवृत्तीनंतर त्या काही काळ महिला संघाच्या सिलेक्टरही राहिल्या. त्यांना अर्जुन आणि पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे.
१९५७
ऑफस्पिनर शिवलाल यादव यांचा जन्म. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी भारतातर्फे १०२ विकेट घेतल्या. टिच्चून ऑफस्पिन गोलंदाजी आणि तळाच्या क्रमांकावर ब-यापैकी फलंदाजी केलेले शिवलाल यादव नंतर सिलेक्टरही होते.
१९८१
ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेड कसोटीत संदीप पाटील यांनी १७४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियन भूमीवर एखाद्या भारतीय फलंदाजाने केलेली त्यावेळची ती सर्वोत्तम खेळी होती.
१९८९
ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अॅलन बॉर्डर त्यांच्या फलंदाजीसाठी प्रसिद्ध होते. पण या दिवशी त्यांनी गोलंदाजीत करामत दाखवली. वेस्ट इंडिजविरुद्ध सिडनी कसोटीत पहिल्या दिवशी त्यांनी ४६ धावांमध्ये सात विकेट्स घेतल्या. संपूर्ण सामन्यात त्यांनी ११ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने ती कसोटी सात विकेट्सनी जिंकली.
१९९३
२६ जानेवारी म्हणजे ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय दिवस. ऑस्ट्रेलिया डे. मात्र १९९३मध्ये या दिवशी त्यांना एका कडवट पराभवाला सामोरे जावे लागले. वेस्ट इंडिजविरुद्ध अॅडलेड कसोटीत विजयासाठी चौथ्या डावात १८६ धावा हव्या असताना, कर्टली अँबरोज आणि कोर्टनी वॉल्शच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा डाव १८४ धावांवर संपुष्टात आला.
१९४८
एकाच कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये शतक झळकवणारे विजय हजारे भारताचे पहिले फलंदाज ठरले. त्यांनी ११६ आणि १४५ धावा केल्या. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ६४५ धावांच्या डोंगरापुढे भारताला फॉलो-ऑन मिळाला होता. हजारे यांनी पाठोपाठच्या दिवशी ही शतके झळकवली. अशी कामगिरी करणारे ते कसोटी इतिहासातील एकमेव फलंदाज.
१९७४
श्रीलंकेटा हरहुन्नरी क्रिकेटपटू चमिंडा वासचा जन्म. मुथय्या मुरलीधरनच्या झळाळीमुळे त्याची कारकीर्द ब-यापैकी झाकोळली गेली. स्विंग आणि सीम गोलंदाजीवर त्याची हुकुमत होती. शिवाय खालच्या क्रमांकावर येऊन आक्रमक फटकेबाजी करण्याबद्दलही तो प्रसिद्ध होता. वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी (१९ धावांत आठ विकेट्स वि. झिम्बाब्वे) त्याच्याच नावावर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ३०० बळी आणि ३००० धावा, वनडे क्रिकेटमध्ये ४०० बळी नि २००० धावा ही कामगिरी उल्लेखनीयच आहे.
१९७९
न्यूझीलंडचा कर्णधार आणि नामवंत डावखुरा फिरकी गोलंदाज डॅनियल व्हेटोरी याचा जन्म. १८व्या वर्षी कसोटी पदार्पण करणारा तो न्यूझीलंडचा सर्वात लहान क्रिकेटपटू तसेच १०० कसोटी बळी घेणाराही तो सर्वात युवा गोलंदाज ठरला.
१९९१
ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्क टेलर इंग्लंडविरुद्ध अॅडलेड कसोटीत दुस-या डावात धावचीत झाला. यापूर्वी वेस्ट इंडिजमध्येही तो दोन्ही डावांत धावचीत झाला होता. दोन कसोटी सामन्यांमध्ये दोन्ही डावांत धावचीत होणारा तो एकमेव फलंदाज.