क्रिकेटच्या मैदानावरील रंजक घडामोडी…
१८७९
दक्षिण आफ्रिकी क्रिकेटचे ‘ग्रँड ओल्ड मॅन’ संबोधले जाणारे आर्थर विल्यम डेव्ह नर्स यांचा जन्म. ते दक्षिण आफ्रिकेकडून सलग ४५ कसोटी सामने खेळले. वयाच्या ५७व्या वर्षापर्यंत ते प्रथम श्रेणी क्रिकेटही खेळले.
१९५२
ऑस्ट्रेलियाचे विख्यात अष्टपैलू क्रिकेटपटू रिची बेनॉ यांचे कसोटी पदार्पण. वेस्ट इंडिजविरुद्ध सिडनीतील त्या सामन्यात बेनॉ यांची कामगिरी फारशी लक्षणीय नव्हती. त्यांनी ३ व १९ धावा केल्या, तसेच १४ धावांमध्ये एकच विकेट घेतली. अर्थात त्यांच्या अपयशाची फारशी झळ बसली नाही, कारण ऑस्ट्रेलियाने तो सामना २०२ धावांनी जिंकला. बेनॉ यांनी क्रिकेटपटू, कर्णधार आणि नंतर समालोचक म्हणून क्रिकेट विश्वात छाप पाडली.
१९५७
इंग्लंडविरुद्ध डर्बनमधील किंग्जमीड मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे ऑफस्पिनर ह्यू टेफील्ड यांनी एकही धाव न देता सलग १३७ चेंडू टाकले. सलग ‘डॉट बॉल्स’चा हा विक्रम अजूनही अबाधित आहे.
१९७६
भारताचे सुरिंदर अमरनाथ यांचे पदार्पणाच्या कसोटीत शतक. त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध ऑकलंड कसोटीत १२४ धावा केल्या. त्यांचे वडील आणि माजी कर्णधार लाला अमरनाथ यांनीही कसोटी पदार्पणातच शतक झळकवले होते. अशी कामगिरी करणारी कसोटी इतिहासातील ही एकमेव पिता-पुत्र जोडी!
१९८५
न्यूझीलंडविरुद्ध ऑकलंड येथे झालेल्या दुस-या कसोटीसाठी पाकिस्तानी कर्णधार जावेद मियांदाद याने एका १८ वर्षीय गोलंदाजाचा समावेश त्याच्या संघात केला. तो खूपच नवखा होता आणि त्याच्याकडे गोलंदाजीसाठी आवश्यक शूज्ही नव्हते. त्या सामन्यातही १०५ धावांमध्ये दोन विकेट्स अशी त्याची माफक कामगिरी होती. तो गोलंदाज होता वासिम अक्रम. कर्णधार जावेदचा विश्वास त्याने पुढे सार्थ ठरवला. रिची बेनॉप्रमाणेच त्याचेही पदार्पण गाजले नाही, पण भविष्यात त्याने छाप पाडली.
१९९१
२५ जानेवारी या दिवशीच आणखी एक कसोटी पदार्पण. क्रिकेटपटूचे नाव मार्क वॉ. ऑस्ट्रेलियन संघात त्याचा समावेश करण्यासाठी त्याच्या जुळ्या भावाला म्हणजे स्टीव्ह वॉलाच वगळण्यात आले होते! मार्कने पदार्पणातच शतक झळकवले. इंग्लंडविरुद्ध त्याने पहिल्या डावात १३८ धावा केल्या.
२००१
देबाशिष मोहंतीने पूर्व विभागाकडून खेळताना दक्षिण विभागाविरुद्ध दुलीप ट्रॉफी लढतीत ४६ धावांमध्ये १० विकेट्स घेतल्या. आगरताळ्याला झालेला तो सामना पूर्व विभागाने चार विकेट्सनी जिंकला.
२००८
ऑस्ट्रेलियाच्या अँडॅम गिलख्रिस्टने कसोटी क्रिकेटमध्ये यष्टींमागे सर्वाधिक ४१३ बळींचा विक्रम मागे टाकला. अँडलेड कसोटीत गिलख्रिस्टच्या बळींची संख्या ४१६वर गेल्यानंतर त्याने निवृत्ती जाहीर केली. हा विक्रम आधी दक्षिण आफ्रिकेच्या मार्क बाउचरच्या नावावर होता. बाउचरने महिन्याभरातच नवीन विक्रम प्रस्थापित केला.