जाणून घ्या क्रिकेटच्या इतिहासात २४ जानेवारी रोजी घडलेले रंजक किस्से
१९१०
डर्बन कसोटीच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांचे डाव १९९ अशा समान धावसंख्येवर संपले. कसोटी इतिहासात पहिल्या डावातील ती पहिलीच बरोबरी (टाय) होती.
१९३०
वेलिंग्टनमध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या सलामीच्या जोडीने २७६ धावा जोडल्या. स्टीव्ही डेम्पस्टर यांनी १३६ धावा केल्या. न्यूझीलंडतर्फे कसोटी इतिहासातील ते पहिले शतक ठरले.
१९५०
डर्बन कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध थरारक विजय. ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन न देता दक्षिण आफ्रिकेने तिस-या डावात फलंदाजी केली. त्यांचा डाव ९९ धावांमध्येच संपुष्टात आला. विजयासाठीचे ३३६ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने पाच विकेटच्या मोबदल्यात गाठले. नील हार्वे यांनी नाबाद १५१ धावा केल्या.
१९६८
ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाचा भारतावर थरारक विजय. विजयासाठी चौथ्या डावात ३९५ धावांचे आव्हान भारताने स्वीकारले. एम. एल. जयसिंहाच्या शतकाच्या जोरावर भारताने पाच बाद ३०५ अशी मजल मारली होती. पण बॉब काउपर आणि जॉन ग्लीसन यांनी भारताचा प्रतिकार संपुष्टात आणला.
१९७०
झिम्बाब्वेचा माजी अष्टपैलू नील जॉन्सन याचा जन्म. एकदिवसीय क्रिकेटमध्ये आणि विशेषत: १९९९ मधील वर्ल्डकप स्पर्धेत त्याने छाप पाडली. सलामीला फलंदाजी आणि सलामीला गोलंदाजी करणा-या मोजक्या क्रिकेटपटूंपैकी तो एक होता. कसोटी क्रिकेटमध्ये पेशावर सामन्यातील शतक आणि हरारेत पदार्पणाच्या सामन्यात सचिन तेंडुलकरची विकेट ही त्याच्या कारकीर्दीची प्रमुख वैशिष्टय़े ठरली. दोन्ही सामन्यांमध्ये झिम्बाब्वेने संस्मरणीय विजय मिळवले होते.
१९७६
सुरिंदर अमरनाथ, सय्यद किरमानी आणि दिलीप वेंगसरकर यांनी न्यूझीलंडविरुद्ध ऑकलंड येथे कसोटी पदार्पण केले. सुरिंदर अमरनाथ यांनी त्या सामन्यात शतकही झळकावले. पण त्यांच्यापेक्षा वेंगसरकर आणि किरमानी यांची कारकीर्द अधिक प्रदीर्घ आणि लक्षणीय ठरली.
१९८३
पाकिस्तानच्या मुदस्सर नझरने भारताविरुद्ध लाहोर कसोटीत सलामीला येऊन शतक झळकवले आणि तो संपूर्ण डावात नाबाद राहिला. नाबाद १५२. गंमत म्हणजे त्याचे वडील नझर मोहंमद यांनीही पाकिस्तानसाठी अशी कामगिरी केली होती.
२००८
इंडियन प्रिमियर लीगमधील (आयपीएल) आठ संघमालकांची (फ्रँचायझी) घोषणा. मुकेश अंबानींची मुंबई इंडियन्स सर्वात महागडी फ्रँचायझी ठरली.