जाणून घ्या क्रिकेटच्या इतिहासात २२ जानेवारी रोजी घडलेले रंजक किस्से…
१८८३
कसोटी इतिहासातील पहिला डावाचा विजय. इंग्लंडच्या २९४ धावांसमोर ऑस्ट्रेलियाला ११४ आणि १५३ धावाच करता आल्या. एक डाव आणि २७ धावांनी तो सामना जिंकून इंग्लंडने मालिकेत बरोबरी साधली.
१९०२
ऑस्ट्रेलियाचे कॅलम हिल हे इंग्लंडविरुद्ध अॅडलेड कसोटीच्या दुस-या डावात ९७ धावांवर बाद झाले. एकाच कसोटीत दोन्ही डावांमध्ये नव्वदीत बाद झालेले ते पहिले फलंदाज होते. त्यांनी पहिल्या डावात ९८ धावा केल्या होत्या. गंमत म्हणजे ‘नव्र्हस नाइंटीज्’ची त्यांची ती हॅटट्रिक होती. कारण त्यापूर्वी मेलबर्न कसोटीत ते ९९ धावांवर बाद झाले होते!
१९२१
वेस्ट इंडिजचे माजी कसोटीपटू अँड्रयू गांत्यूमे यांचा जन्म. त्यांची फलंदाजी सरासरी डॉन ब्रॅडमन यांच्यापेक्षाही अधिक होती! आता ११२ अशी सरासरी देऊनही ते फारसे प्रसिद्ध न होण्याचे कारण ते एकच कसोटी सामना खेळले! १९४७-४८ या काळात वेस्ट इंडिजकडे असलेल्या मातब्बर फलंदाजांमुळे शतक झळकवूनही गांत्यूमे यांचा पुढे कसोटी संघासाठी विचारच झाला नाही.
१९५३
पॉली उम्रीगर यांनी वेस्ट इंडिजमधील मालिकेत पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदादमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात शतक झळकवले. कॅरेबियन भूमीवर शतक ठोकणारे ते पहिले भारतीय फलंदाज ठरले.
१९७०
दक्षिण आफ्रिकेचे महान फलंदाज बॅरी रिचर्ड्स यांचे कसोटी पदार्पण. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या मालिकेत त्यांनी ७२.५७च्या सरासरीने ५०८ धावा केल्या. पण वर्णद्वेषी धोरणाबद्दल दक्षिण आफ्रिकेवर बहिष्कार टाकण्यात आला आणि रिचर्ड्स यांची कारकीर्द अकाली संपुष्टात आली.
१९७८
इंग्लंडचे महान फलंदाज हर्बर्ट सटक्लिफ यांचे निधन. त्यांनी १९२४ ते १९३५ या काळात ६०.७३च्या सरासरीने ४५५५ धावा केल्या.
१९८०
ऑस्ट्रेलियातील पहिल्या-वहिल्या तिरंगी एकदिवसीय मालिकेचे अजिंक्यपद वेस्ट इंडिजने पटकावले. त्यांनी अंतिम सामन्यात इंग्लंडला आठ विकेट्सनी हरवले. वर्ल्डकपच्या कक्षेबाहेरची ती पहिली बहुराष्ट्रीय स्पर्धा होती.
१९९०
पाकिस्ताना वेगवान गोलंदाज वासिम अक्रमचे पहिले कसोटी शतक. या खेळीने त्याच्या संघाला पराभवाच्या गर्तेतून सुखरूप बाहेर काढले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेड कसोटीत पहिल्या डावात ८४ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर पाकिस्तानची हालत पाच बाद ९० अशी झाली होती. पण अक्रमने १२३ धावांची खेळी केली. कर्णधार इम्रान खानबरोबर (१३६) त्याने १९१ धावांची भागीदारी केली आणि पाकिस्तानला तो सामना अनिर्णित राखता आला.
२००४
वनडे क्रिकेटमध्ये यष्टयांमागे ३०० बळी घेणारा ऑस्ट्रेलियाचा अॅडॅम गिलख्रिस्ट जगातील पहिला यष्टिरक्षक ठरला. भारताविरुद्ध सिडनीत ब्रेट लीच्या गोलंदाजीवर सौरव गांगुलीचा झेल घेऊन त्याने हे शिखर गाठले.
२००६
न्यूझीलंडचा गुणवान अष्टपैलू क्रिकेटपटू ख्रिस केर्न्स याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती.