जाणून घ्या क्रिकेटच्या इतिहासात २० जानेवारी रोजी घडलेले रंजक किस्से…
१८८३
कसोटी इतिहासात एखाद्या इंग्लिश गोलंदाजाची पहिली हॅटट्रिक! ऑफस्पिनर बिली बेट्स यांनी तीन ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद करून ही करामत साधली. त्यांनी सामन्यात एकूण १४ विकेट घेतल्या. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरील तो सामना इंग्लंडने डावाने जिंकला. कसोटी इतिहासातील तो पहिला डावाचा विजय.
१९०८
स्कॉटिश वंशाचे आणि इंग्लंडसाठी खेळलेले लेगस्पिनर इयन पीबल्स यांचा जन्म. ते १९२७ ते १९३१ या काळात कसोटी क्रिकेट खेळले आणि एका सामन्यात त्यांच्या गोलंदाजीसमोर साक्षात डॉन ब्रॅडमन यांची भंबेरी उडाली होती. पण पीबल्स क्रिकेटपटूपेक्षाही संडे टाइम्सचे क्रिकेट रिपोर्टर म्हणून अधिक गाजले. खुसखुशीत लिखाणासाठी ते प्रसिद्ध होते.
१९४५
प्रसिद्ध इंग्लिश क्रिकेट पत्रकार आणि समालोचक ख्रिस्तोफर मार्टिन-जेनकिन्स यांचा जन्म. दिवस-रात्र रंगीत पोशाख घालून क्रिकेट खेळण्याचा प्रकार त्यांना फारसा मानवला नव्हता. या क्रिकेटला उद्देशून ‘पायजमा क्रिकेट’ असा उल्लेख त्यांनी प्रथम केला.
१९६७
दक्षिण आफ्रिकेचे माजी विख्यात अष्टपैलू माइक प्रॉक्टर यांचे कसोटी पदार्पण. दक्षिण आफ्रिकेवर बहिष्कार टाकला गेल्यामुळे ते केवळ ७ कसोटी सामनेच खेळू शकले. त्यांतही त्यांनी १५.०२ च्या सरासरीने ४१ विकेट घेतल्या.
१९७७
दक्षिण आफ्रिकेचा चायनामन फिरकी गोलंदाज पॉल अॅडॅम्स याचा जन्म. चेंडू टाकताना बेडूकउडीसदृश उसळी घेण्याची त्याची शैली प्रत्यक्ष गोलंदाजीपेक्षाही गाजली. दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी पदार्पण करणारा तो सर्वात युवा क्रिकेटपटू होता. मात्र केवळ शैली चमत्कारिक असली, तरी त्याच्या गोलंदाजीत एरवी फारसा चमत्कार नव्हता. फलंदाजीही सुमार असल्यामुळे ४५ कसोटींच्या पलीकडे त्याची कारकीर्द लांबली नाही.
१९८०
कपिलदेव आणि सुनील गावस्कर यांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने मद्रास कसोटीत पाकिस्तानचा १० विकेटनी पराभव केला आणि भारतात झालेली ती मालिका २-० अशी जिंकली. तब्बल २७ वर्षानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध मालिका जिंकली होती.
२००७
मखाया एन्टिनीने कसोटी क्रिकेटमध्ये ३००वा बळी मिळवला. पाकिस्तानविरुद्ध पोर्ट एलिझाबेथ येथे त्याने ही कामगिरी केली.