जाणून घ्या क्रिकेटच्या इतिहासात १७ जानेवारी रोजी घडलेल्या ठळक घडामोडी…
१९१२
इंग्लंडचे जॅक हॉब्ज यांनी सलग दुसरे शतक झळकावून ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या संघाला अॅडलेड कसोटी जिंकून दिली. या विजयासह इंग्लंडने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आणि नंतर ती ४-१ अशी जिंकली.
१९२५
पाकिस्तानचे पहिले कसोटी कर्णधार अब्दुल हफीझ कारदार यांचा जन्म. ते भारताकडून अब्दुल हफीझ या नावाने तीन कसोटी सामनेही खेळले. पाकिस्तानच्या पहिल्या २३ कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी नेतृत्व केले. १९५४ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने ओव्हलवर संस्मरणीय विजयही मिळवला. आक्रमक डावरे फलंदाज राहिलेले कारदार यांनी डाव्या हाताने मध्यमगती गोलंदाजीही केली. निवृत्तीनंतर ते पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष होते. पाकिस्तानच्या क्रिकेटचे अध्वर्यू अशी त्यांची ओळख होती.
१९२६
वेस्ट इंडिजच्या सुप्रसिद्ध ‘डब्लू’ त्रिमूर्तीपैकी एक क्लाइड वॉलकॉट यांचा जन्म. क्लाइड वॉलकॉट, एव्हर्टन वीक्स आणि फ्रँक वॉरेल या त्रिमूर्तीने वेस्ट इंडिज क्रिकेटचे एक युग गाजवले. गुडघ्यावर बसून स्क्वेअर कट मारण्याची त्यांची छबी गाजली. १९५३ ते १९५५ या काळात त्यांनी १२ कसोटींमध्ये १० शतके लगावली होती. त्यांतील पाच ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकाच मालिकेत झाली. त्यांनी निवृत्तीनंतर आयसीसी सामनाधिकारी म्हणूनही काम पाहिले. ४४ कसोटी सामन्यांत त्याची सरासरी ५६.६८ अशी आहे.
१९२८
ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू केन आर्चर यांचा जन्म. यांनी क्रिकेटविश्वात (पाच कसोटी) विशेष काही करून दाखवले नाही. पण त्यांचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांना अमेरिकेत बेसबॉल खेळण्याची ऑफर मिळाली होती. क्रिकेट आणि बेसबॉलमध्ये पारंगत असलेल्या फारच कमी क्रिकेटपटूंमध्ये त्यांची गणना होते.
१९७३
भारताचा इंग्लंडवर ओव्हल कसोटीत संस्मरणीय विजय. हा सामना जिंकून भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आणि नंतर ती टिकवली. या सामन्यात भारतातर्फे पहिल्या डावात सुनील गावस्कर आणि एकनाथ सोलकर यांनी सलामीला.. गोलंदाजी केली! पण नंतर बिशनसिंग बेदी, भागवत चंद्रशेखर, इरापल्ली प्रसन्ना आणि सलिम दुराणी यांच्या फिरकीनेच इंग्लंडच्या २० विकेट घेतल्या. चौथ्या डावात विजयासाठी ८६ धावा जमवतानाही भारताच्या सहा विकेट पडल्या होत्या.
१९८५
मोहंमद अझरुद्दीने त्याच्या दुस-या कसोटीत दुसरे शतक झळकावले. चेन्नईमध्ये इंग्लंडविरुद्ध अझरुद्दीनने १०५ धावा केल्या. कोलकात्याला इंग्लंडविरुद्धच त्याने पदार्पणात ११० धावा केल्या होत्या. पहिल्या दोन कसोटींमध्ये दोन शतके झळकावून तो बिल पॉन्सफर्ड, डग वॉल्टर्स, आल्विन कालिचरण यांच्या पंक्तीत जाऊन बसला.
२००८
अनिल कुंबळेचा कसोटी क्रिकेटमधील ६००वा बळी. शेन वॉर्न आणि मुथय्या मुरलीधरन यांच्या पाठोपाठ अशी कामगिरी करणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ कसोटीत अँड्रय़ू सायमंड्सला बाद करून कुंबळेने हा विक्रम केला.