क्रिकेटच्या मैदानावरील रंजक घडामोडी
१९३१
सर डॉन ब्रॅडमन यांनी सात महिन्यांतले चौथे द्विशतक या दिवशी झळकावले. स्थळ ब्रिस्बेन, प्रतिस्पर्धी वेस्ट इंडिज. ब्रॅडमन यांच्या २२३ धावा त्यावेळी ऑस्ट्रेलियातल्या सर्वाधिक वैयक्तिक धावा ठरल्या.
१९३३
‘बॉडीलाइन’ मालिकेला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील परस्परद्वेषाचा रंग मिळाला. १४ जानेवारीला अॅशेस कसोटीच्या दुस-या दिवशी हॅरॉल्ड लारवुड आणि बिल व्होस यांच्या दहशती गोलंदाजीने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना शेकवून काढले होते. १५ जानेवारीला विश्रांतीचा दिवस असूनही अॅडलेड आणि ऑस्ट्रेलियातही जनमत प्रक्षुब्ध होते. या दिवशी म्हणजे १६ जानेवारी रोजी ऑस्ट्रेलियातल्या त्यावेळच्या दैनिकांनी वातावरण आणखी तापवले. त्यामुळे खबरदारी म्हणून अॅडलेड ओव्हलवर पोलिस घोडदळ तैनात करण्यात आले. हा निर्णय दूरदृष्टीचा ठरला. कारण त्याही दिवशी ‘बॉडीलाइन’ डावपेच वापरायला इंग्लिश कर्णधार डग्लस जार्डिन किंवा लारवुड-व्होस अजिबात कचरले नाहीत. लारवुडचा एक भयानक बाउन्सर ऑस्ट्रेलियन फलंदाज बर्ट ओल्डफील्डच्या डोक्यावर आदळला. ३२ हजार प्रेक्षक संतप्त झाले. त्यामुळे पोलिसांनी सीमारेषेवर कडे केले. तरीही लारवुडला प्रेक्षकांकडून फळांचा प्रसाद मिळालाच!
१९९३
डीन जोन्सचे नखरे त्याला आणि ऑस्ट्रेलियाला नडले. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर बेन्सन अँड हेजेस तिरंगी स्पर्धेच्या पहिल्या फायनलमध्ये, कर्टली अँबरोजचा पांढरा रिस्टबँड लक्ष विचलित करतो म्हणून जोन्सने त्याला तो काढायला लावला. अँबरोज वैतागला, त्याने रिस्टबँड काढला. पण उत्तर वेगळ्या पद्धतीने दिले. ३२ धावांमध्ये पाच विकेट्स घेऊन त्याने जोन्स आणि ऑस्ट्रेलियाला धडा शिकवला. वेस्ट इंडिजने तो सामना अर्थातच जिंकला.
१९९६
ऑस्ट्रेलियाचीच मेलबर्नवर आणखी एक नामुष्की. ऑस्ट्रेलियाने ठेवलेले २३४ धावांचे लक्ष्य श्रीलंकेने आरामात गाठले. ‘अंडरडॉग’ म्हणून सतत हिणवल्या गेलेल्या श्रीलंकेचा तो विजय कौतुकास्पद होता. रोमेश कालुवितरणाने ३१ चेंडूंमध्येच ५० धावा चोपल्या. ग्लेन मॅकग्राला विशेष प्रसाद मिळाला. एरवी अचूक आणि टिच्चून गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या मॅकग्राचे त्या दिवशीचे पृथक्करण होते ९.४-०-७६-१!
१९९७
अँथनी स्टुअर्ट या ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने पाकिस्तानविरुद्ध मेलबर्नला एका एकदिवसीय सामन्यात हॅटट्रिक घेतली. वनडे इतिहासातली ती १२वी हॅटट्रिक ठरली. पण या हॅटट्रिकचा स्टुअर्टला काहीच उपयोग झाला नाही. कारण नंतर त्याला संघात कधीच घेतले गेले नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटच्या सामन्यात हॅटट्रिक घेतलेला तो एकमेव गोलंदाज.
२००६
पहिल्या विकेटसाठी ४१३ धावांच्या विक्रमी भागीदारीचा विक्रम मोडण्याची संधी वीरेंदर सेहवाग आणि राहुल द्रविड यांना होती. पण सेहवाग बाद झाला आणि ४१० धावांवर पहिली विकेट पडली. अर्थात मूळ विक्रमही विनू मांकड आणि पंकज रॉय या भारतीय जोडीच्याच नावावर आहे.