जाणून घ्या क्रिकेटच्या इतिहासात १५ मे रोजी घडलेल्या रंजक घडामोडी
१९१७
ऑस्ट्रेलियन विकेटकीपर रॉन सॅगर्स यांचा जन्म. ते सहाच कसोटी सामने खेळले, कारण त्या काळात म्हणजे ४०च्या दशकाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाकडे डॉन टॅलन हे मुरब्बी विकेटकीपर होते. ऑस्ट्रेलियन डोमेस्टिक संघ न्यू साउथ वेल्सकडून ते प्रदीर्घ काळ खेळले.
१९१९
इंग्लिश ऑलराउंडर चार्ल्स पामर यांचा जन्म. ते वास्तविक एकच कसोटी खेळले. पण एका डोमेस्टिक सामन्यात त्यांनी केलेली अफलातून कामगिरी पामर यांना अजरामर करून गेली. १९५५मध्ये लीस्टरशायरकडून खेळताना सरेसारख्या तगड्या संघाविरुद्ध त्यांनी एका सामन्यात एकदा आठ विकेट्स घेतल्या, एकही धाव न देता! त्यांतीलही सात विकेट्स त्रिफळाचीतच्या होत्या. इतर दोन गोलंदाजांना एंड बदलता यावेत म्हणून पामर कर्णधार म्हणून केवळ एक षटक टाकण्यासाठी आले. त्यांचे त्या सामन्यातील पृथक्करण होते २७-२४-८-८!
१९२४
इंग्लंडकडून खेळलेले पण केवळ डोमेस्टिक क्रिकेटच गाजवलेले आणखी एक इंग्लिश फलंदाज डॉन केन्यन यांचा जन्म. इंग्लिश कौंटी वुर्स्टरशायरकडून त्यांनी सर्वाधिक ३४ हजार ४९० धावा जमवल्या. पण ते आठच कसोटी सामने खेळले आणि केवळ एकच अर्धशतक त्यांना झळकवता आहे.
१९३५
इंग्लंडचे एक शैलीदार फलंदाज एडवर्ड राल्फ ‘टेड’ डेक्स्टर यांचा जन्म. ते शैलीबरोबरच बेडर वृत्तीसाठीही प्रसिद्ध होते. अनेकदा त्यांनी इंग्लंडला पराभवाच्या गर्तेतून बाहेर काढले. ६२ कसोटी सामन्यांमध्ये ४७.८९ अशा सरासरीने ४५०२ धावा जमवताना त्यांनी नऊ शतके आणि २७ अर्धशतके झळकवली. जवळपास ३५च्या सरासरीने मिळवलेल्या ६६ विकेट्स डेक्स्टर यांना एक चांगला ऑलराउंडर सहज ठरवून जातात.
१९४८
ऑस्ट्रेलियाचा एक अफलातून विक्रम, जो कधीही मोडला जाण्याची चिन्हे नाहीत. इसेक्सविरुद्ध एका टूर मॅचमध्ये त्यांनी एकाच दिवसात ७२१ धावांचा पाऊस पाडला! अवघ्या १२९ षटकांमध्ये हा उत्पात घडला. जो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक विक्रम ठरतो. त्या ७२१ धावांमध्ये सर डॉन ब्रॅडमन यांच्या सर्वाधिक १८७ धावा होत्या, ज्या बनल्या १२५ मिनिटांमध्ये! दुस-या दिवशी इसेक्सचे दोन्ही डाव ८३ आणि १८७ धावांमध्येच आटोपले! एक डाव आणि ४५१ धावांनी ऑस्ट्रेलिया विजयी ठरले.
१९९९
वर्ल्डकप १९९९मध्ये पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा भारतावर सहज विजय. पण हा सामना अधिक गाजला हॅन्सी क्रोनिएच्या हायटेक आगाऊपणामुळे. त्या सामन्यात क्रोनिए क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात उतरला, त्यावेळी त्याच्या कानात इयरपीस होता. तो थेट प्रशिक्षक बॉब वुल्मर यांच्याकडून सूचना घेत होता. पण पहिल्याच ड्रीक्स ब्रेकमध्ये सामनाधिकारी तलत अली यांनी क्रोनिएला इयरपीस काढून टाकायला लावला.