डॉलरच्या तुलनेत रुपया बुधवारी आणखी घसरला. डॉलरच्या तुलनेत रुपया ६४.४४ च्या स्तरावर पोहचला आहे.
मुंबई – परकीय वित्तीय संस्था आणि बँकांकडून डॉलरची मागणी वाढल्यामुळे बुधवारी डॉलरने आणखी एका निचांकी पातळीला स्पर्श केला. डॉलरच्या तुलनेत रुपया ६४.४४ वर पोहचला आहे.
सकाळी बाजार खुला होताच डॉलरच्या तुलनेत रुपया ६४.३३ वर पोहचला होता. काही वेळानंतर रुपया सुधारत असल्याची सुचिन्ह दिसली. मात्र शेवटी दिवसभरात त्यात १.७ टक्क्यांची घट नोंदवत ६४.४४ वर बंद झाला. हा आतापर्यंतचा सर्वात निचांकी स्तर आहे. रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या उपाययोजनांचा परिणाम रुपयावर फारसा दिसून आला नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
रुपयाचे सतत होत असल्यामुळे शेअर बाजारातही निरुत्साहाचे वातावरण आहे. पहिल्या सत्रात ३५० अंशांची घट नोंदवणा-या सेन्सेक्सची घसरण दिवसभर सुरुच राहिली. शेवटच्या सत्रात सेन्सेक्समध्ये ४०० तर निफ्टीमध्ये १०० अंशांची घट झाली. सेन्सेक्स १७,९७६.०६ वर बंद झाला. तर निफ्टीही ५३०२.५५ अंशांवर बंद झाला. रिझर्व्ह बँकेने बाजारात मंगळवारी बॉन्ड्सची विक्री केल्यानंतर बँक स्टॉक्समध्ये ५.९३ अंशांची वाढ झाली होती. मात्र बुधवारी त्यात ०.५ टक्क्यांची घट झाली. एसबीआय १.२ टक्के,आयसीआयसीआयचे शेअर्स २.४ टक्क्यांपर्यत घसरले.
दरम्यान, या महिन्याभरात डॉलरच्या तुलनेत रुपया ७० पर्यंत घसरु शकतो अशी शक्यता डच बँकेने जारी केलेल्या पत्रकात व्यक्त केली आहे. मात्र त्यात लवकरच सुधारणा होईल असेही पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.