मतदान गुप्ततेचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणात निवडणूक आयोगाने काँग्रेस उपाध्यक्ष आणि अमेठीचे उमेदवार राहुल गांधी यांना क्लीनचीट दिली आहे.
नवी दिल्ली – मतदान गुप्ततेचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणात निवडणूक आयोगाने काँग्रेस उपाध्यक्ष आणि अमेठीचे उमेदवार राहुल गांधी यांना क्लीनचीट दिली आहे.
राहुल गांधी यांनी मतदान यंत्राजवळ जाऊन मतदान गुप्ततेचे उल्लंघन केलेले नाही. राहुल गांधी जेव्हा मतदान यंत्राजवळ उभे होते तेव्हा मतदान यंत्रात बिघाड झाला होता. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊ शकत नाही असे मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस.संपथ यांनी शनिवारी सांगितले.
सात मे रोजी अमेठीमध्ये मतदान झाले त्यावेळी राहुल गांधी अमेठीतील एका मतदान केंद्रात मतदान यंत्राजवळ उभे असल्याचे छायाचित्र प्रसिध्द झाले होते. विरोधी पक्षांनी याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्य़ानंतर आयोगाने जिल्हा अधिका-याकडून यासंबंधी अहवाल मागवला.
या अहवालानुसार राहुल गांधी साडेदहाच्या सुमारास मतदान केंद्रात पोहोचले तेव्हा मतदान यंत्रात बिघाड झाला होता. राहुल गांधी फक्त ते मतदान यंत्र पाहण्यासाठी तेथे गेले होते. त्यावेळी मतदान सुरु नव्हते.