राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एनसीईआरटी) देशभर घेण्यात येणारी प्रज्ञाशोध परीक्षा राज्यात १७ नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे.
मुंबई – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एनसीईआरटी) देशभर घेण्यात येणारी प्रज्ञाशोध परीक्षा राज्यात १७ नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी शाळांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत असेल.
राज्यात या परीक्षेचे आयोजन करणा-या महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या http://www.mscepune.in/या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. यासाठी लागणारी स्टेट बँक ऑफ इंडियाची चलने संबंधित शाळांसाठी जिल्हा शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद आणि मुंबईसाठी शिक्षण निरीक्षक, दक्षिण, पश्चिम, उत्तर विभाग आणि गटशिक्षणाधिका-यांकडे उपलब्ध करण्यात आली आहेत. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे सर्व अर्ज हे शाळांनी भरायचे आहेत.
दहावीत शिकणा-या कोणत्याही विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज करता येईल. यासाठी विद्यार्थ्यांकडून १२० रुपये परीक्षा शुल्क घेतले जाईल. तसेच संस्थेकडून संलग्नता शुल्क म्हणून दर शैक्षणिक वर्षासाठी २०० रुपये आकारण्यात आले आहेत. मात्र ‘एनसीईआरटी’तर्फे घेण्यात येणा-या द्विस्तर परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना करणे, हा या प्रज्ञाशोध परीक्षा योजनेचा गाभा आहे. या योजनेत विज्ञान, समाजशास्त्र, अभियांत्रिकी, आरोग्य, व्यवस्थापन व विधी या विषयांचा समावेश होतो. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात येते. मूलभूत विज्ञान, सामाजिकशास्त्र, वाणिज्य यातील पीएच.डी. पदवी प्राप्त करेपर्यंत विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळते. अभियांत्रिकी, वैद्यकीय व्यवस्थापन आणि विधी यांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी पदव्युत्तर पदवीपर्यंतच ही शिष्यवृत्ती मिळते.