विरोधी पक्षांनी डावपेच आखण्यास सुरुवात केली असून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला तगडी स्पर्धा निर्माण करेल अशा वजनदार उमेदवाराचा शोध सुरू केला आहे.
नवी दिल्ली- देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेली व्यक्ती निवडली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी डावपेच आखण्यास सुरुवात केली असून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला तगडी स्पर्धा निर्माण करेल अशा वजनदार उमेदवाराचा शोध सुरू केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाला पसंती दर्शविल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून समजते.
राष्ट्रपतीपदासाठी सुरुवातीला संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांच्या नावावर विचार सुरू होता. मात्र, त्यांच्या नावाची चर्चा आता मागे पडली असल्याचे समजते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश करात व सीताराम येच्युरी यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीविषयी या भेटीत चर्चा झाल्याचे समजते.
शरद पवार यांच्याकडे अतिरिक्त मते खेचण्याची प्रचंड क्षमता आहे. त्यांची स्वीकारार्हताही इतर कोणत्याही नेत्यापेक्षा अधिक आहे. शरद पवार राष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरल्यास ते एनडीएची मते फोडू शकतात.