रायगड-इंदापूर येथील सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी लोणावळ्यात घडली होती.
नेरळ, कर्जत, मुरूड – रायगड-इंदापूर येथील सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी लोणावळ्यात घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ रायगडवासीयांनी शुक्रवारी पुकारलेल्या बंदला कर्जत-नेरळमधील व्यापा-यांनी तसेच सर्वसामान्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे या भागात शुकशुकाट पसरला होता. नेरळमध्येही व्यापा-यांनी दुकाने बंद ठेवली.
कर्जतमध्ये शुक्रवारी आठवडा बाजार भरतो; परंतु या बाजारातील व्यापा-यांनीही शुक्रवारी बंद पाळला. सर्वच राजकीय पक्षांनी कर्जत बंदला पाठिंबा दिल्याने बंद यशस्वी झाला. दरम्यान या घटनेचा तपास लवकरात लवकर व्हावा आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी रायगड आणि मावळ येथी जैन समुदायाने मावळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता.
या मोर्चात कर्जत, नेरळमधील जैन समाजाचे कार्यकत्रे मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. दवाखाने, औषधांची दुकाने, सरकारी कार्यालये वगळता नेरळमध्ये कडकडीत बंद पाळला गेला. मुरूडमध्येही जैन समुदायाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आल्यानंतर बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याला मुरूडवासीयांना पाठिंबा देत कडकडीत बंद पाळला. त्यामुळे बाजारपेठा दुकाने बंद होती.