रायगड जिल्ह्यातील जमिनींचे दर वाढलेले असताना बांधकाम व्यावसायिकांकडून आता सरकारच्या वन जमिनींवर अतिक्रमण करून त्या बळकावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत
अलिबाग – रायगड जिल्ह्यातील जमिनींचे दर वाढलेले असताना बांधकाम व्यावसायिकांकडून आता सरकारच्या वन जमिनींवर अतिक्रमण करून त्या बळकावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. जिल्ह्यातील १० हजार ३ हेक्टर जमिनीवर आदिवासी नसलेल्यांनी अतिक्रमण करून जवळजवळ ९५ टक्के क्षेत्र बांधकामासाठी वापरले आहे. यात वनपरिक्षेत्रातील पेणमध्ये येणा-या पेण आणि पनवेल तालुक्यातील अतिक्रमणांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
वन जमिनींवर बांधकामाची परवानगी नसतानाही ९ हजार ८६८ हेक्टर जमिनींवर धनिकांनी बांधकामे केली असल्याचे आढळून आले असल्याची माहिती जिल्हा वनअधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. वन जमिनींवर आदिवासी समुदायांना पहिले प्राधान्य दिले जाते. त्यांचा उदरनिर्वाह वनसंपत्ती गोळा करणे, त्याची बाजारात विक्री करणे आदी कामांवर अवलंबून असतो. अन्न, घरबांधणी व शेतीसाठीही आदिवासी वनांवरच अवलंबून असतात.
परंतु जिल्ह्यात आदिवासींच्या अतिक्रमणाचे प्रमाण बिगर आदिवासींपेक्षा अगदी नगण्य आहे. वन जमिनीवर अतिक्रमण करण्यात पेण, पनवेल, खालापूर या भागात वाढ होत आहे. झपाटयाने नागरिकरण होत असलेल्या तालुक्यांचे प्रमाण जास्त असून हे अतिक्रमण दूर करणे वन विभागाला अवघड जात आहे. पेण-पनवेलमध्ये ‘९८५४.५८७५ हेक्टर ‘आर’ वन क्षेत्रे बांधकाम करण्यासाठी वापरण्यात आली आहेत. तर ३३.९७३६ हेक्टर आर. जमिनीवर अतिक्रमण करून लागवड करण्यात आली आहे. एकटया पेण वनपरिक्षेत्रात १८० अतिक्रमण केलेल्यांची संख्या आहे.
सुधागड-पाली या आदिवासीबहुल तालुक्यातही २०९ जणांनी ८३.५०३० या हेक्टर ‘आर’ क्षेत्रावर अतिक्रमण केले असून यातील ७७.०३०० हेक्टर ‘आर’ जमीन लागवडीसाठी वापरली आहे. त्याचबरोबर अलिबाग तालुक्यातही मोठया प्रमाणावर वन जमिनींवर अतिक्रमण वाढले आहे. यात कांदळवनांचाही समावेश असल्याचे संबंधित अधिका-यांचे म्हणणे आहे. ही अतिक्रमणे हटवण्यास वनविभागाला अवघड जात आहे. वाढते औद्योगिकीकरण आणि त्याबरोबरच निवासी जागेच्या टंचाईमुळे येथील जमिनींचे भाव वाढतच आहेत. त्यातच फार्महाऊस तयार करून लागवडीसाठीही वन जमिनींचा वापर होत असल्याचे आढळून येत आहे.
वन परिक्षेत्र | तालुका | अतिक्रमण संख्या | लागवड क्षेत्र | बांधकाम क्षेत्र | एकूण क्षेत्र |
वडखळ | पेण-अलिबाग | १६६ | १९.५०४८ | १.९७२३ | २१.४७७१ |
पेण | पेण-पनवेल | १८० | ३३.९७३६ | ९८५४.५८७५ | ९६७९.५६११ |
नागोठणे | पेण-सुधागड-रोहा | ५३ | ४.५७५० | ०.२६८९ | ४.८४४९ |
अलिबाग | अलिबाग | १८७ | ०.६४२२ | १३.८२३८ | १४.४६६० |
सुधागड-पाली | सुधागड-पाली | २०९ | ७७.०३०० | ६.४७३० | ८३.५०३० |
एकूण | ७९५ | १३५.७२५६ | ९८६८.१२५५ | १०००३.८५११ |