रामकृपाल यादव यांनी मंगळवारी सकाळी नवी दिल्ली विमानतळावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह आणि भाजप नेते रवीशंकर प्रसाद यांची भेट घेतली.
नवी दिल्ली – राष्ट्रीय जनता दलाचे बंडखोर नेते रामकृपाल यादव यांनी मंगळवारी सकाळी नवी दिल्ली विमानतळावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह आणि भाजप नेते रवीशंकर प्रसाद यांची भेट घेतली.
या भेटीमुळे त्यांची भाजप प्रवेशांची शक्यता वाढली असून, यासंबंधी येत्या एक-दोन दिवसात ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत. रामकृपाल यादव बिहारच्या पाटलीपूत्रमधुन भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र ही जागा योगगुरु बाबा रामदेव यांनी आपल्या एका समर्थकासाठी मागितली आहे. त्यामुळे भाजप ही जागा रामकृपाल यादव यांना देणार कि, नाही ते अजून स्पष्ट झालेले नाही.
राजदप्रमुख लालूप्रसाद यादव यांचे एकेकाळी विश्वासू सहकारी असणारे रामकृपाल यादव त्यांच्या घराणेशाहीवर नाराज आहेत. त्यांनी पत्रकारपरिषद घेऊन राजदमधील सर्व पदांचा राजीनामा देताना आपली नाराजी बोलून दाखवली होती.
रामकृपाल यादव यांना पाटलीपूत्रमधुन राजदचे तिकीट हवे होते मात्र लालूंनी या जागेवरुन आपली कन्या मिसा भारतीला उभे केले आहे. त्यामुळे रामकृपाल यादव यांनी बंडखोरी केली असून, ते भाजपच्या वाटेवर आहेत. राजनाथ सिंह यांच्याबरोबर माझी चांगली चर्चा झाली मी उद्या याविषयावर बोलेन असे रामकृपाल यादव यांनी पत्रकारांना सांगितले.