राधे माँ दोषी आढळल्यास तिच्यावर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर व राज्य कार्यवाह मिलिंद देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे- राधे माँ दोषी आढळल्यास तिच्यावर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर व राज्य कार्यवाह मिलिंद देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. राधे माँने मांडलेल्या आध्यात्मिक बाजाराचे दर्शन चक्रावून सोडणारे आहे. समाजसुधारकांच्या महाराष्ट्रात बुवाबाजीला थारा असणार नाही, ही अपेक्षा यामुळे फोल ठरली असल्याचेही त्यांनी सांगितले.
आपल्यात अंतिद्रिय शक्ती असल्याचे भासवून अथवा एखाद्या व्यक्तीत अतिंद्रिय शक्ती संचारली असल्याचा आभास निर्माण करून इतरांच्या मनात भीती निर्माण करणे किंवा त्या व्यक्तीचे सांगणे न ऐकल्यास वाईट परिणाम होतील, अशी इतरांना धमकी देणे, फसवणे हा जादूटोणा कायद्यातील कलम पाचप्रमाणे दखलपात्र गुन्हा आहे. मुंबईस्थित गुप्ता कुटुंबातील निकी गुप्ता या महिलेने दिलेल्या तक्रारीची आणि राधे माँच्या एकूणच आध्यत्मिक दरबाराची पोलिसांनी कसून चौकशी करावी. राधे माँ आणि संत यांची तुलनाच होऊ शकत नाही. ज्ञानेश्वर, तुकाराम, गाडगेबाबा हे निष्कलंक संत होते, असे डॉ. हमीद दाभोलकर यांनी सांगितले.
अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० ऑगस्ट रोजी दोन वष्रे पूर्ण होत आहेत; मात्र अजूनही मारेक-यांपर्यंत पोलिसांना पोहोचता आले नाही. या पार्श्वभूमीवर अंनिसच्या वतीने २० ऑगस्ट रोजी निषेध रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले आहे, असेही डॉ. हमीद यांनी सांगितले.