आपल्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या याचिका मागे घेण्याची विनंती करणा-या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नोटिस पाठवली आहे.
नवी दिल्ली- आपल्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या याचिका मागे घेण्याची विनंती करणा-या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नोटिस पाठवली आहे. यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी आपले मत मांडावे अशी सूचना न्यायालयाने केली आहे.
राज ठाकरे यांनी २००८मध्ये छट पूजे दरम्यान बिहारी लोकांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावर बिहारमधील वकील सुधीर कुमार ओझा यांनी याचिका दाखल केली होती. मुझफ्फपूर येथील न्यायालयाने राज ठाकरे यांच्या विरोधात अजामीन पात्र वॉरंट बजावले होते. ओझा यांच्याबरोबच झारखंडमधील सुधीर कुमार या वकीराने राज यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. राज यांनी बिहार आणि उत्तर प्रदेशमधील लोकांचा अपमान केल्याचे या याचिकेत म्हटले होते.
राज यांच्याविरोधात दखल करण्यात आलेल्या एकूण १६ खटले सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिल्ली न्यायालयात वर्ग करण्यात आले होते.
मुंबईत केलेल्या विधानावर झारखंड आणि बिहारमध्ये कशी काय याचिका दाखल करु शकतात असे राज यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. तसेच बदनामी करण्यासाठी आपल्याविरुद्ध याचिका दाखल केल्याचे याचिकेत म्हटले आहे.
याआधी ३० जानेवारी रोजी राज यांच्या विरोधातील अजामीन पात्र वॉरंटला दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती.