मनसेच्या झेंडय़ातील ‘हिरवा रंग’ भिंवडी किंवा बेहरामपाडय़ांसाठी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई – राज्यातील मराठी मतदारांनी पूर्णपणे पाठ फिरवल्यानंतर राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या अजेंडय़ात मराठी सोडून आता हिंदुत्वाच्या मुद्दय़ाला हात घातला आहे. ‘मी हिंदू आहे व हिंदुत्वासाठी उभा राहणार’, अशी नवी भूमिका त्यांनी मांडली. मनसेच्या झेंडय़ातील ‘हिरवा रंग’ भिंवडी किंवा बेहरामपाडय़ांसाठी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज यांच्या मनसेत जाप-पात आणि धर्मविरहित राजकारण असेल असे आश्वासनही त्यांनी दिले होते. मात्र गेल्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसे कोठेच टिकू शकला नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेत १३ आमदार निवडून देणा-या मनसेला केवळ एकाच जागेवर यश मिळाले. त्यामुळे गेले काही दिवस मनसे शांत होती. मनसेचा मराठी मुद्दा कोठेच टिकत नसल्याचे पाहून त्यांचे अनेक साथीदार मनसे सोडून भाजपा-शिवसेनेत गेले. त्यामुळे अंतर्गत खचलेले राज ठाकरे नव्या राजकीय भूमिकेच्या शोधात होते.
गुरुवारी रूईया महाविद्यालयातील एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांची ही नवी भूमिका लोकांसमोर आली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या मराठीच्या मुद्दय़ावर त्यांनी अचानक यू-र्टन घेतला. ‘मी मराठीच्या आदी हिंदू आहे, हिंदुत्वासाठीच उभा राहणार. आझाद मैदानातील मुस्लीम मोर्चाविरोधात प्रथम मीच रस्त्यावर उतरलो होतो. असे सांगत मनसेच्या झेंडय़ामधील हिरवा रंग भिंवडी किंवा बेहरामपाडय़ासाठी नाही, असे ते म्हणाले.