मनसेच्या १२ फेब्रुवारीला होणा-या रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क पोलिसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावली आहे.
मुंबई – मनसेच्या १२ फेब्रुवारीला होणा-या रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क पोलिसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावली आहे.
कलम १४९ अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आली असून, मनसेच्या रास्ता रोकोमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास राज ठाकरेंना यासाठी जबाबदार धरण्यात येईल अस या नोटीसमध्ये म्हटल आहे.
१२ तारखेला होणा-या या आंदोलनात स्वत: राज रस्त्यावर उतरणार असल्यामुळे मनसे कार्यकर्ते अधिक आक्रमक होऊ शकतात असा पोलिसांचा कयास आहे. रस्त्यावरील ही राडेबाजी रोखण्यासाठी पोलिसांनी आधीच राज्यभरातील मनसे पदाधिका-यांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटीसा बजावल्या आहेत.
मनसेचे वर्चस्व असलेल्या मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबादमध्ये रस्त्यावर मोठया प्रमाणावर पोलिस फौजफाटा तैनात रहाणार आहे. टोलनाक्याजवळ मोठया प्रमाणात पोलिस बंदोबस्त असेल. आंदोलनाची रणनिती ठरवण्यासाठी मनसेच्या माहिम मध्यवर्ती कार्यालयात आज बैठक होणार आहे. आंदोलनात राज नेमके कुठे सहभागी होणार याविषयी अजूनही अस्पष्टता आहे.
राज यांनी टोलच्या मुद्यावरुन थेट राज्य सरकारला हिंमत असेल तर अटक करुन दाखवा असे आव्हान दिले आहे. गृहमंत्री आर.आर.पाटील यांनीही कायदा कुणालाही हातात घेऊ देणार नाही. तसा कोणी प्रयत्न केला तर कडक कारवाई करु असा इशारा दिला आहे. त्यामुळे उद्याचा दिवस महाराष्ट्रातील राजकरणाच्या दुष्टीने महत्वाचा आहे.