शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतीयांवर केलेल्या प्रक्षोभक भाषणांबद्दल सर्वोच्च न्यायलयाने शुक्रवारी निवडणूक आयोगाला नोटिस पाठवली.
नवी दिल्ली- शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतीयांवर केलेल्या प्रक्षोभक भाषणांबद्दल सर्वोच्च न्यायलयाने शुक्रवारी निवडणूक आयोगाला नोटिस पाठवली. या दोन्ही नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांवर निवडणूक आयोगाने काय कारवाई केली, याचा तपशील देण्याची सूचना न्यायालयाने केली आहे.
ब्रिजेश कलापा या वकिलाने उद्धव व राज ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे आदेश दिले. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात राज ठाकरे यांनी बिहारींविरोधात अक्षेपार्ह विधाने केली होती.
उद्धव ठाकरे यांनीसुद्धा परप्रांतीयांबद्दल प्रक्षोभक उद्गार काढले होते, असे कलापा यांनी आपल्या याचिकेत नमूद केले होते. यासंबंधी सुनावणी करताना आर. एम. लोढा आणि ए. आर. दवे यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाला दोघांवरील कारवाईबाबत विचारणा करणारी नोटिस पाठवली.