जनरल मोटर्स व राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत गुरुवारी दिली.
मुंबई- जनरल मोटर्स व राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत गुरुवारी दिली. या करारांतर्गत राज्यात ६,४०० कोटींची गुंतवणूक होणार असून यातून मोठय़ा प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली.
कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेरी बारा यांनी याबाबत भारत व सिंगापूरच्या वरिष्ठ अधिका-यांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
जनरल मोटर्स कंपनीने देशांतर्गत मागणी आणि निर्यातीची गरज पूर्ण करण्यासाठी पुण्यातील तळेगाव येथील प्रकल्पाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीची तळेगाव येथील वाहननिर्मितीची क्षमता सध्या १,७०,००० युनिट्स इतकी आहे.
या प्रकल्पातून शेव्हर्ले ब्रँडखाली दहा नव्या मोटारी बाजारात आणल्या जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकल्पासाठी तीनशे एकर जागा महाराष्ट्रात औद्योगिक विकास महामंडळाकडून ९५ वर्षाच्या कराराने देण्यात आली आहे. यातून १००० लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
या सामंजस्य करारानंतर मुख्यमंत्री विधानसभेत निवेदन करत असताना विधानसभेच्या गॅलरीत मेरी बाराही उपस्थित होत्या. या वेळी मुख्यमंत्र्यांनी आणखी एक अमेरिकन मोटार उत्पादक क्रायस्लरही राज्यात २००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले.