गुरुवारी झालेल्या जिह्यातील चार नगर परिषदा आणि एका नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणुकीत दोन ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस तर दोन ठिकाणी महायुतीने बाजी मारली.
रत्नागिरी – गुरुवारी झालेल्या जिह्यातील चार नगर परिषदा आणि एका नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणुकीत दोन ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस तर दोन ठिकाणी महायुतीने बाजी मारली. तर खेड नगर परिषदेवर अपेक्षेप्रमाणे मनसेने बाजी मारली.
अडीच वर्षाची मुदत संपलेल्या जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड आणि राजापूर या नगर परिषदांसह दापोली नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी गुरुवारी निवड प्रक्रिया घेण्यात आली. या पाचपैकी राजापूर आणि चिपळूण या दोन नगर परिषदांवरील आपली पकड काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने अधिक मजबूत केली. रत्नागिरी आणि दापोलीत महायुतीला यश मिळाले. खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणुकीत मनसेने बाजी मारली.
राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी मुमताज काझी तर उपनगराध्यक्षपदी रवींद्र बावधनकर यांची निवड झाली. या निवडणुकीत महायुतीचा दणदणीत पराभव झाला. चिपळूण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीचा दणदणीत पराभव केला. चिपळूण नगराध्यक्षपदी सावित्री होमकळस तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे लियाकत शहा विजयी झाले.
रत्नागिरीत बहुमत असतानाही रंगतदार झालेल्या निवडणुकीत तिघांनी अर्ज मागे घेतल्याने नगराध्यक्षपदी भाजपचे महेंद्र मयेकर तर उपनगराध्यक्षपदी सेनेचे राहुल पंडित विजयी झाले. दापोली नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत झाल्याने रंगत वाढली होती. नगराध्यक्षपदासाठी सेनेचे जावेद मणियार, राष्ट्रवादीचे नितीन मयेकर आणि मनसेच्या गौरी शिर्के मैदानात होत्या. मात्र, नगर पंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक फुटल्याने सेनेचे जावेद मणियार नऊ मतांनी नगराध्यक्षपदी विजयी झाले. उपनगराध्यक्षपदी सचिन जाधव हेही नऊ मतांनी विजयी झाले. खेड नगर परिषदेच्या निवडणुकीत मनसेच्या उर्मिला शेटय़े-पाटणे नऊ मतांनी विजयी झाल्या. उपनगराध्यक्षपदी वैभव खेडेकर विजयी झाले.