आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करत असलेल्या राजस्थान रॉयल्सने गुरुवारी सनरायझर्स हैदराबादला नमवत सलग चौथ्या विजयाची नोंद केली.
विशाखापट्टणम – आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करत असलेल्या राजस्थान रॉयल्सने गुरुवारी सनरायझर्स हैदराबादला नमवत सलग चौथ्या विजयाची नोंद केली.
गोलंदाजांचा प्रभावी मारा आणि सलामीवीर अजिंक्य रहाणेच्या (६२) धावा यांच्या कामगिरीच्या जोरावर राजस्थानने विजयी चौकार लगावला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणा-या राजस्थानने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत हैदराबादला १२७ धावांवर रोखले.
विजयासाठी माफक लक्ष्य असूनही राजस्थानने संयमी खेळण्यावर भर देत शेवटच्या चेंडूवर विजय साकारला. डेव्हीड वॉर्नर, शिखर धवन, इयॉन मॉर्गन, रवी बोपारा हे हैदराबादचे महत्वाचे फलंदाज मोठी खेळी साकारु शकले नाहीत. वीस-पंचवीसीमध्ये हे फलंदाज बाद झाल्याने हैदराबादला फक्त १२७ धावांपर्यंत मजल मारता आली.
दुस-या बाजूला राजस्थानकडून अजिंक्य रहाणे आणि संजू सॅमसनने ६४ धावांची दमदार सलामी दिली. सूंज सॅमसनला (२६) रवी बोपाराने बाद करत ही जोडी फोडली. रहाणे बाद होणारा राजस्थानचा चौथा आणि शेवटचा फलंदाज ठरला.
रहाणे संघाच्या ११८ धावा असताना बाद झाला. बाऊल्टने त्याच्या यष्टया वाकवल्या. पण तो पर्यंत विजय दृष्टीपथात आला होता. स्टुअर्ट बिन्नी जेम्स फॉकनरने राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.