अनेक वर्षे वीजचोरीपासून चार हात लांबच राहिलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही आता वीजचोरीचा कलंक लागला आहे.
रत्नागिरी – अनेक वर्षे वीजचोरीपासून चार हात लांबच राहिलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही आता वीजचोरीचा कलंक लागला आहे. या दोन्ही जिल्ह्यात आकडा टाकून वीजचोरीचे प्रकार वाढीस लागले असून, जादा विजेचा वापर आणि मीटर छेडछाडीद्वारे वीजचोरीच्या घटनाही वाढीस लागल्या आहेत. वीजचोरीत सिंधुदुर्ग जिल्ह्यापेक्षा रत्नागिरी जिल्हा आघाडीवर असून, पाचशेपैकी ४९१ वीजचो-या रत्नागिरीत सापडल्या आहेत.
एप्रिल २०१३पासून फेब्रुवारीअखेपर्यंत महावितरणकडून दोन्ही जिल्ह्यांत तब्बल पाचशे वीजचोरांवर कारवाई करत १९ लाख ८६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. भविष्यात वीजचोरांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा महावितरणच्या अधिका-यांनी दिला आहे. राज्यामध्ये अनेक जिल्हय़ांमध्ये वीजचोरीचे अनेक प्रकार सातत्याने उघडकीस येत असतात.
प. महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडय़ामध्ये तर वीजवाहिन्यांवर आकडे टाकून वीजचोरी केली जाते. यामुळे महावितरणचे मोठे नुकसान होत असते. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये गेल्या अनेक वर्षात आकडा टाकून वीजचोरी केल्याचा प्रकार उघडकीस येत नव्हता. मात्र मागील दहा महिन्यांत आकडा टाकून वीजचोरीच्या तब्बल १२ घटना उघडकीला आल्या आहेत.
महावितरणच्या भरारी पथकासह उपविभाग कार्यालयातील कनिष्ठ अभियंता व गुणवत्ता नियंत्रक व विशेष पथकांनी कोकणच्या या दोन जिल्ह्यांतील वीजचोरीच्या घटना उघड केल्या आहेत. यापैकी रत्नागिरी जिल्ह्यात आठ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार घटना समोर आल्या आहेत.
या वर्षी वीज मीटरमध्ये फेरफार करून चोरटय़ा पद्धतीने जादा वीज वापरणा-या वीजग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गतील १९३ वीजग्राहकांवर अशा स्वरूपाची कारवाई करण्यात आली. यामध्ये रत्नागिरीतील १०६ आणि सिंधुदुर्गतील ८७ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून २० लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.
जुन्या मीटरमध्ये लोहचुंबक टाकून किंवा आकडे टाकून चक्राची गती कमी करणे आदीपासून नव्या आलेल्या इलेक्ट्रिक मीटरमध्येही फेरफार करून रीडिंग कमी केले जाते. इलेक्ट्रिक मीटरमध्ये फेरफार करण्याच्या अनेक क्लृप्त्या केल्या जात असल्याचे उघडकीस आले आहे. वर्षभरामध्ये तब्बल ६०५ ग्राहकांवर वीजचोरी प्रकरणात दोन्ही जिल्हय़ांमध्ये कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरीतील ६०१ आणि सिंधुदुर्गातील चार वीजग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे.