सणासुदीला घरांची सजावट हा महत्त्वाचा विषय असतो. घराला दिले जाणारे रंग हा त्यामधील एक विशेष भाग आहे.
काही दिवसांवर आलेल्या दिवाळीची तयारी सध्या सर्वत्र चालू असल्याचे दिसते. त्यातील सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे डेकोरेशन. आपले घर सणासुदीला जास्तीतजास्त सुंदर कसे करता येईल याचा प्रयत्न घरातील मंडळी करतात. डेकोरेशन करताना सुरुवातीचा विषय असतो, घराला रंग कोणता द्यायचा. वेगवगेळ्या सणाला घराला रंग देणे काही परवडणारे नसल्याने दिवाळीचा शुभ मुहूर्त म्हणून घराला रंग दिला जातो. काहीजण आपल्याला आवडतो तोच रंग घराला दिल्यावर त्याला साजेशा रंगांचे बेडशीट, पडदे दिवाळीसाठी विशेष खरेदी केले जातात. एक प्रकारे घर पूर्ण वेगेवेगळ्या रंगानी सजवले जाते.
काही जण वास्तुशास्त्रानुसार आपलं घर सजवतात. वास्तू शास्त्रात दिल्याप्रमाणे कोणत्या दिशेला कोणता रंग असायला पाहिजे तसेच कोणत्या खोलीला कोणता रंग दिला पाहिजे हे वास्तूशास्त्रामध्ये दिलेलं असतं. वास्तुशास्त्रात निळा, हिरवा, पिवळा, लाल, जांभळा, गुलाबी हे रंग घरातील भितींवर देण्यासाठी वापरण्यात येतात. त्यात निळा, लाल आणि गुलाबी हे रंग विशेष खोल्यांसाठी वापरले जातात. हिरवा रंग हा चांगले वातावरण निर्माण करणारा आहे. पिवळा रंग हा धैर्य आणि सयंमाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे हा रंग देवघरात अधिक असल्याचे दिसते. शक्तीचे प्रतीक म्हणून नारिंगी रंग ओळखण्यात येतो. लाल रंग आनंदाचं वातावरण निर्माण करणारा असतो. जांभळा रंग हा विश्वासाचे प्रतीक समजले जाते. दिशेप्रमाणे वास्तुशास्त्रात पूर्व दिशेला सफेद, तर पश्चिम दिशेला निळा, हिरवा हा उत्तर तर नैऋत्य दिशेला गुलाबी, ईशान्य दिशेला पिवळा असे रंग वापरण्यात येतात.
साधारण घरांना फिकट रंग देण्यात येतात त्याचे एक कारण म्हणजे, छोटय़ाशा बल्बचासुद्धा भरपूर प्रकाश घरामध्ये पसरताना दिसतो. यंदाच्या दिवाळीमध्ये घरांना विशेष रंग देताना काही गोष्टींचा विचार करूया.. निसर्गाच्या अनेक छटा पाहताना जेव्हा आपण आभाळाकडे पाहतो तेव्हा केशरी, पिवळ्या रंगाच्या छटा जर आपल्या घराच्या भिंतींवर असतील तर? यासाठी काही प्लास्टिक कलर्स सुद्धा बाजारात आले आहेत. नेरोल्ॉक,डय़ुलक्स, एशियन पेंट यांसारख्या कंपन्या आपल्या घर व सण सुंदर करण्यासाठी मदत नक्की करतील. सजावटीमध्ये रंगकामाला एका उंचीवर नेऊन ठेवते. रंगकाम झाले म्हणजे सजावट पूर्ण झाली असेच काहीसे दिसून येते. उत्तम रंगसंगतीवर सणांच्या दिवशी डेकोरेशन करण्याची धमाल ही काहीशी वेगळीच.